नवी दिल्ली - भारतीय साखर कारखान्यांची संघटना असलेल्या इस्माच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार १५ एप्रिलपर्यंत देशातील साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. यादरम्यान देशात २४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ लाख टन कमी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत देशात २६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
गेल्या वर्षी १५ एप्रिलपर्यंत देशात २४५ कारखान्यांत उसाचे गाळप सुरू होते, तर १५ एप्रिल २०१६ ला ११७ साखर कारखान्यांत उसाचे
गाळप सुरू आहे. पुढील काही महिन्यांतच कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांची देणी कमी होण्याची अपेक्षा असल्याचे मतही इस्माच्या वतीने व्यक्त करण्यात अाले आहे.
राज्यात उत्पादन वाढले : १५ एप्रिल २०१६ पर्यंत महाराष्ट्रात एकूण ९.९६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. याच समान कालावधीत गेल्या वर्षी एकुण ८.३६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तामिळनाडूमध्ये १५ एप्रिलपर्यंत एकूण ९.२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
कर्नाटकात उत्पादन घटले
कर्नाटकमध्ये चालू हंगामात साखर उत्पादनात घट झाली आहे. १५ एप्रिल २०१६ पर्यंत कर्नाटकमध्ये एकूण ४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच
कालावधीत ४.६ लाख टन उत्पादन झाले होते. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान १.३५ लाख टन साखरेची निर्यात करण्यात अाली आहे. आतापर्यंत देशांतर्गत विक्री १३.२ लाख टन झाली आहे. गेल्या वर्षी एकूण साखर विक्री १२.७ लाख टन झाली होती.