आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिकंदरच्या ग्रीसचे ‘मुकद्दर’ रुसले!, जनमत विराेधात गेल्यास युरोझोनच्या बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अथेन्स/नवी दिल्ली - कधीकाळी सारे जग जिंकणाऱ्या सिकंदरचा ग्रीस आज बाजारातील बाजी मात्र हरताना दिसतो आहे. नशिबानेे (मुकद्दर) साथ दिली नाही तर दिवाळखोरीत निघणारा २१ व्या शतकातील तो पहिलाच देश ठरेल. आजवर माणसे व कंपन्यांचीच दिवाळखोरीच जाहीर झाली आहे.
ग्रीसवर ११ लाख कोटींंपेक्षा जास्त कर्ज आहे. त्याच्या पहिल्या हप्त्यापोटी १२ हजार कोटी रुपये देण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. ग्रीस अटी मान्य करत नाही तोपर्यंत ही मुदत वाढवायला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) अजिबात तयार नाही. गडद होत चाललेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारांचे लक्ष आता ५ जुलै रोजी हाेणाऱ्या जनमत चाचणीकडे लागले आहे.
ग्रीसने अटी मान्य कराव्यात की नाही, या मुद्द्यावर ग्रीसचे नागरिक मतदान करतील. ग्रीसने आर्थिक सुधारणांची मागणी फेटाळून लावली तर २० जुलैला होणाऱ्या युरोझोनच्या बैठकीत हा देश दिवाळखोर जाहीर केला जाईल. शिवाय युरोझोनमधूनही बाहेर फेकला जाईल.
कुवतीपेक्षा जास्त खर्च करण्यासाठी बदनाम झालेल्या ग्रीसमध्ये ६ जुलैपर्यंत सर्व बँका बंद आहेत. एटीएममधून ६० युरोपेक्षा (सुमारे ४३०० रुपये) जास्त पैसे काढण्यावर बंदी आहे. त्यामुळे एटीएमवर प्रचंड रांगा लागल्या आहेत. लोकांना परवानगीशिवाय बाहेर पैसे पाठवता येत नाहीत. शेअर बाजारही बंद पडला आहे.
आर्थिक संकटाबाबत इत्थंभूत तपशील असा
किती कर्ज ग्रीसवर ११.१४ लाख कोटी कर्ज आहे. ते देशाच्या जीडीपीच्या १७५% आहे. भारतावरील कर्ज जीडीपीच्या ६८% आहे.
आज काय? आयएमएफचे १२ हजार कोटी देणे आहे.आयएमएफ मुदत वाढवणार नाही, परंतु ५ जुलैपर्यंत वेळ दिली जाण्याची शक्यता आहे.
अटी न मानल्यास ग्रीस युरोपियन संघ व युरोझोनमधून बाहेर पडेल. मग त्याला ड्रॅकमा हे जुने चलन आणावे लागेल. पण ते सोपे नाही. युरो-ड्रॅकमाचे प्रमाण निश्चित करणे अवघड जाईल.
काय शक्य आहे? ग्रीसशी व्यापारावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे. हे कठोर पाऊल असेल. ग्रीसची आयात- निर्यात बंद होऊ शकते.
ही विचारसरणींचीही लढाई
ग्रीसचे नवे सरकार डाव्या तर आयएमएफ व पाश्चात्त्य देश भांडवलशाही विचारसरणीचे आहेत. आयएमएफच्या अटीनुसार ग्रीस सरकारी खर्च कपातीस तयार आहे. पण तो करात वाढही करू इच्छितो. आयएमएफला ते मान्य नाही.
तर २००८ सारखी आर्थिक मंदी?
ग्रीसच्या आर्थिक संकटाचा परिणाम २००८ च्या लीमन संकटापेक्षा कमी असेल. परंतु अल्पकाळातच परिणाम दिसेल. बाजाराला आधीच संकटाची चाहूल लागली आहे. त्यामुळे दीर्घकालीन परिणाम होणार नाही.
आपल्यावर परिणाम, अगदीच थोडासा
भारताच्या एकूण निर्यातीत ग्रीसचा वाटा ०.१% तर आयातीत ०.०३% आहे. जी अडचण येईल ती चलनामुळे. युरो जास्त कोसळला तर युरोझोनमधील निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होईल.
संकट वाढले तर? विकासदरात अल्पशी घसरण शक्य. व्याजदर वाढतील.
शेअर बाजारांचे काय? अनिश्चितता असेल तर एफआयआय पैसे काढून घेतात. चढ- उतार दिसतील. सेन्सेक्स सोमवारी ६०० अंकांनी कोसळला, पण नंतर सावरला.
कर्जमाफी द्या, नाही तर भोगा
ग्रीसला कर्जमाफी द्या किंवा १० वर्षांसाठी परतफेड रोखा.त्याला आणखी मदत द्यावी. अन्यथा जगभर संकटाचा वणवा पसरेल.
-जोसेफ स्टिगलिज, नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ

जगभरात घसरण
अमेरिकी बाजार१.५० %
चीनचा शांघाय३.५३ %
जपानचा निक्केई२.८८ %
हाँगकाँगचा हँगसेंग२.६१ %
जर्मनीचा डेक्स३.५६ %
फ्रान्सचा कॅक३.७४ %
बातम्या आणखी आहेत...