आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ बाजारातील डाळींचे दर पुन्हा पोहोचले 200 रुपयांच्या जवळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डाळींच्या किमती पुन्हा एकदा २०० रुपये प्रतिकिलोच्या जवळपास पोहाेचल्या आहेत. त्यामुळे सरकारने अतिरिक्त साठ्यात पाच टक्क्यांची वाढ करून लाख टनावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या वतीने १२० रुपये प्रतिकिलो दराने डाळींची किरकोळ विक्री करण्यात येणार आहे. भविष्यात डाळींच्या किमतीत जास्त वाढ होऊ नये यासाठी सरकारच्या वतीने डाळींचा अतिरिक्त साठा करण्यात येत आहे. असे असले तरी राज्यांच्या वतीने केंद्राकडे डाळींची मागणी करण्यात आलेली नाही.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार उडदाची डाळ किरकोळ बाजारात १९६ रुपये प्रतिकिलोच्या दरावर पोहाेचली आहे. तर तूर डाळीच्या किमतीदेखील १६६ रुपये प्रतिकिलोच्या जवळपास पोहाेचल्या आहेत. मुगडाळ १२० रुपये तर मसूरडाळ १०५ रुपये प्रतिकिलोच्या जवळ पोहाेचली आहे. मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात डाळींचा साठा १.५ लाख टनाने वाढवून लाख टन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आला होता. या अतिरिक्त साठ्यासाठी सरकारच्या वतीने सरळ शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे. ही डाळ नंतर सरकार किरकोळ बाजारात १२० रुपये प्रतिकिलोच्या दराने विक्री करणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना ६६ रुपये प्रतिकिलोच्या दराने डाळी देण्याची तयारी दाखवली असून राज्यांच्या माध्यमातूनच या डाळी १२० रुपये प्रतिकिलोने विक्री करण्याची सरकारची योजना आहे. असे असले तरी राज्यांच्या वतीने या योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही. कडधान्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे यंदा डाळींचे दर वाढले आहेत.

आयातीचा निर्णय
आतापर्यंत केंद्र रसरकारने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला १०,००० टन डाळींचा साठा दिलेला आहे. सध्याचा अतिरिक्त साठा राज्यांना देऊन आणखी डाळी आयात करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. चालू हंगामात देशभरातील कडधान्यांचे उत्पादन घटले असून त्याचा परिणाम मागणी आणि पुरवठ्यावर झाल्यामुळे डाळींचे दर वाढले आहेत. यंदा देशात १.७० कोटी टन कडधान्य उत्पादित होण्याचा अंदाज असून देशात २.३५ कोटी टन कडधान्यांची मागणी असते.