आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economic Weekly Review In Divya Marathi Written By R Jagannathan

आकार कमी केल्यास तेजीने वाढू शकतील आयटी कंपन्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात देशातील दोन मोठ्या आयटी कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिसने आपल्या तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर २०१५) अार्थिक निकाल जाहीर केले. टीसीएसने डॉलरमध्ये होणाऱ्या घसरणीमुळे गेल्या तिमाहीच्या तुलनेत ०.३ टक्क्यांची घसरण झाल्याची नोंद केली आहे. इन्फोसिससाठी यात ०.६ टक्क्यांची वाढ झाली. हा निकाल जाहीर झाल्यानंतर इन्फोसिसच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. हे वर्ष व्यवसायाच्या दृष्टीने चांगले राहणार असल्याची घोषणा इन्फोसिसने केली. वर्षभरासाठी व्यवसायात वाढ होण्याचा अंदाजदेखील इन्फोसिसने वाढवला असून यात १० ते १२ टक्क्यांवरून १२.८ ते १३.२ टक्के वाढ होण्याचा नवा अंदाज व्यक्त केला अाहे.
वास्तविक दोन्ही कंपन्यांच्या निकालात जास्त अंतर दिसत नसले तरी अनेक बाबींकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्यातील एक म्हणजे २०१४ मध्ये नारायणमूर्तींकडून इन्फोसिसची धुरा सांभाळणारे विशाल सिक्का कंपनीला ग्राहककेद्रित आणि इनोव्हेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. विदेशी कंपन्यांचे अधिग्रहणदेखील करत आहे. दुसरे म्हणजे दोन्ही कंपन्यांच्या कर्मचारी संख्येत खूप अंतर अाहे. डिसेंबर २०१५ पर्यंत इन्फोसिसमध्ये १,९३,३८३ कर्मचारी काम करत होते, तर टीसीएसमध्ये ३,४४,६९१ कर्मचारी होते. येत्या काळात दोन्ही कंपन्या नव्याने भरती करण्यात घट करतील आणि आपले जास्तीत जास्त काम मशिनरीच्या माध्यमातून करण्यावर भर देतील. हे काम एका दिवसात पूर्ण होऊ शकत नसल्यानेच दोन्ही कंपन्या आपली सध्याची उत्पादने चालवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना सेवा देण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहे. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये इन्फोसिसने ५,४०७ आणि टीसीएसने ९,०७१ नवीन कर्मचारी घेतले. गेल्या एका वर्षाच्या दरम्यान टीसीएसचे प्रदर्शन इन्फोसिसच्या तुलनेत थोडे कमजोर राहिले. कंपनीच्या मोठ्या आकारामुळेही असे होऊ शकते. मोठ्या बेससोबत जास्त िवकास करणे कधीकधी अवघड होते. येथे ही बाब लक्षात घ्यावी लागणार आहे की, जास्त कर्मचाऱ्यांची भरती झाल्यानंतर त्यांना सोबत काम करण्यास लावणे महागडे ठरू शकते. ज्या गतीने कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहे, त्याच गतीने कर्मचारी कंपनी सोडून जात आहेत.
म्हणजेच गेल्या तीन महिन्यांत टीसीएसने २२,११८ कर्मचारी जोडले. मात्र, वास्तवात नवीन जोडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या फक्त ९,०७१ राहिली. म्हणजेच १३,०४७ कर्मचारी टीसीएस सोडून गेले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास टीसीएसमध्ये प्रत्येक पाच नवे कर्मचारी घेतल्यानंतर तीन कर्मचारी नोकरी साेडून गेले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कंपनी सोडून जात असल्यामुळेच टीसीएसला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये २,६२८ कोटी रुपयांचा मोठा बोनस वाटावा लागला होता. तरीदेखील कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. या तुलनेत इन्फोसिसची स्थिती थोडी चांगली असली तरी चांगला बोनस आणि पदोन्नती देऊनही प्रत्येक तिमाहीमध्ये कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण कायम आहे.याचे कारण कुणापासूनही लपलेले नाही. ज्या वेळी तुमच्या कंपनीत ३.५ लाख किंवा २ लाख कर्मचारी काम करत असतील, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना मॅनेज करणे सोपे काम नाही. एवढ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांचे अप्रायझल, पगारवाढ, पदोन्नती, अपेक्षा आणि बॉससोबतचा ताळमेळ बसवणे यात अनेक अडचणी असतात. या अडचणींचा मोठ्या कंपन्यांना सामना करावाच लागतो. या सर्व अडचणींचा परिणाम म्हणजेच कर्मचारी नोकरी साेडून जातात. विशेष करून युवा कर्मचारी असेल तर चांगली नोकरी मिळाली की नोकरी सोडण्याची प्रवृत्ती असतेच. आणखी एक समस्या आहे, व्यवस्थापनाची. समजा आपण असे मानले की, प्रत्येक ५० कर्मचाऱ्यांना एका व्यवस्थापकाची आवश्यकता आहे, तर टीसीएससारख्या कंपनीला िवविध पातळ्यांवर कमीत कमी ७,००० व्यवस्थापकांची आवश्यकता असते. अशा अधिकाऱ्यांची मागणी जास्त असल्यामुळे त्यांना पदोन्नतीसह दुसरी नोकरी मिळण्याची शक्यताही जास्त असते. १५ टक्के एट्रिशन दरानुसार टीसीएसला प्रत्येक वर्षी १०५० व्यवस्थापक सोडून जातात. नवीन व्यवस्थापक घेण्याचा अर्थ आहे, की खर्चाबरोबरच मेहनतही घ्यावी लागते.
काही दिवसांपूर्वी विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, दोन लाख कर्मचाऱ्यांना सांभाळणे शक्य असले तरी त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सांभाळणे खूपच अवघड आहे. टीसीएसमध्ये या मर्यादेपेक्षा जास्त कर्मचारी काम करत असून इन्फोसिसचा आकडादेखील याच्या जवळपास पोहोचत आहे. विप्रो या आकड्यापर्यंत पोहोचणारी पुढची कंपनी असेल. कॉग्निजेंट इन्फोसिसपेक्षा मोठी असून त्याच्याआधीच ती दोन लाख कर्मचाऱ्यांच्या संख्येपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
युवा कर्मचाऱ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असताना नवीन कर्मचारी भरती करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे ही भारतीय कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण बनली आहे. आयटी कंपन्यांकडे जगभरातील ग्राहक आहेत. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर काही कर्मचारी ठेवावे लागतात. एकाच देशात किंवा क्षेत्रात, विविध जाती, पार्श्वभूमी किंवा संस्कृतीची माणसे सांभाळणे अजूनच अवघड होते. अमेरिकेने भारतीय आयटी कर्मचाऱ्यांचा व्हिसा तीन टक्क्यांनी वाढवल्यामुळे अनेक आयटी कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर स्थानिक कर्मचाऱ्यांना भरती करण्याचा दबाव येऊ शकतो.
एकूणच कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे मोठ्या आयटी कंपन्यांना त्यांचे व्यवस्थापन करण्यात अडचण येेते. यामुळे कंपन्यांचा विकास मंद गतीने होतो. जर कंपन्यांनी व्यवसाय छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये वाटला किंवा त्यांचे आॅटोमेशन वाढवले तर चांगले काम तर होईलच, त्याचबरोबर तेजीने विकासदेखील होईल.
rjagannathan@dbcorp.in
लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.