आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यसम्राट मल्ल्यांची ६,६३० कोटींची मालमत्ता जप्त,मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सार्वजनिक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकवून परागंदा झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फास आवळण्यास सुरुवात केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात मल्ल्यांच्या फार्म हाऊस, फ्लॅट्स आणि मुदतठेवींसह ६,६३० कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने शनिवारी जप्त केली.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघाकडून घेतलेले ६,०२७ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी गेल्या महिन्यात सीबीआयने मल्ल्यांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर ईडीने तपासाची व्याप्ती वाढवली असून ही ताजी कारवाई नव्याने दाखल गुन्ह्यासंदर्भात आहे.

ईडीच्या वतीने करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. या जप्तीनंतर ईडीने आजवर मल्ल्यांची जप्त केलेली मालमत्ता ८,०४१ कोटींवर पोहोचली आहे. काही महिन्यांपूर्वी ईडीने मल्ल्यांची १,४११ कोटींची संपत्ती जप्त केली होती.

मालमत्ता,किंमत : - मांडवा, अलिबाग येथील फार्म हाऊस- २५ कोटी.
- बंगळुरूच्या किंगफिशर टॉवर्समधील अनेक फ्लॅट्स५६५ कोटी
- खासगी बँकेतील मल्ल्यांच्या मुदतठेवी १० कोटी.
- यूबीएल, मॅकड्वेल होल्डिंगचे शेअर्स ३,६३५ कोटी.
- जप्त मालमत्तेची मूळ किंमत ४,२३४.८४ कोटी आहे. परंतु बाजारभावाने त्याची किंमत सुमारे ६,६३० कोटी भरते.

मायदेशी परतून चौकशीला सामोरे जावे यासाठी दबाव
ईडी मल्ल्याविरुद्धचा तपास आणखी भक्कम करू इच्छिते. मल्ल्याने भारतात परत येऊन चौकशीला सामोरे जावे म्हणून ईडी इंटरपोलद्वारे जागतिक अटक वॉरंट जारी करणे, भारत- ब्रिटन परस्पर साह्यता करार लागू करणे आदी प्रकारच्या उपाययोजना करत आहे.

बँकांना अंधारात ठेवून ३६०० कोटींचे शेअर्स गहाण ठेवले
मल्ल्यांनी कोणतीही अंतर्निहित देणेदारी नसतानाही यूटीआय इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरी सर्व्हिसेस लि. आणि अन्य वित्तीय संस्थांकडे सुमारे ३६०० कोटी रुपयांचे शेअर्स हेतुत: गहाण ठेवले आणि कर्ज देणाऱ्या बँकांना अंधारात ठेवले, असे ईडीने म्हटले आहे.

गुन्हेगारी कटाने कर्ज थकवले
विजयमल्ल्याने किंगफिशर एअर लाइन्स आणि युनायटेड ब्रेव्हरीज होल्डिंग लिमिटेडच्या संगनमताने गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून बँकांच्या कॉन्सोट्रियमकडून ४,९३०.३४ कोटी रुपयांचे मूळ कर्ज मिळवले थकवले. ते अद्यापही थकीत आहे. किंगफिशर एअरलाइन्स, यूबीएल आणि मल्ल्यांकडे पुरेसे पैसे असूनही बँकांची कर्ज परतफेड करण्याची त्यांची इच्छा दिसत नाही, असे ईडीच्या जप्ती आदेशात म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मल्ल्यांविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
बातम्या आणखी आहेत...