आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असहकार्यामुळे मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करा - ईडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द होऊ शकतो. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)परराष्ट्र मंत्रालयाला तसे पत्र पाठवले आहे. चौकशीकरिता ईडीने मल्ल्या यांना तीन नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र तिन्ही वेळा मल्ल्या गैरहजर राहिले. आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटी रुपये कर्जप्रकरणी मल्ल्यांची चौकशी सुरू आहे. मल्ल्या दोन मार्च रोजी देश सोडून गेले आहेत. सध्या ते इंग्लंडमध्ये असल्याचे मानले जाते.

ईडीतील सूत्रांच्या मते, मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करावा यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने दिल्ली विभागीय पारपत्र कार्यालयाला निर्देश द्यावेत, असे ईडीने सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. यासाठी विधी मंत्रालयाशी सल्लामसलत सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मल्ल्या राज्यसभेचे सदस्य आहेत. ईडीने आपल्या पत्रात मल्ल्यांविरुद्ध वेगवेगळ्या कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांचाही उल्लेख केला आहे. कर्ज थकबाकी आणि चेक बाउन्ससंबंधीचे हे खटले आहेत. मल्ल्यांबाबत आम्ही पूर्ण सहकार्य केले असल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यांच्या आग्रहाखातर १८ मार्च, २ एप्रिल आणि ९ एप्रिल अशी तीन वेळा त्यांना मुदत दिली. मात्र त्यांचे असहकार्याचे धोरण कायम आहे. या प्रकरणात ते मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती आवश्यक आहे.

पुढे काय : ईडी कोर्टाकडून घेऊ शकते अजामीनपात्र वाॅरंट
- ईडीच्या पत्रावर परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे. निर्णय झाल्यानंतर मंत्रालय इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन मल्ल्यांना तेथून निघून जाण्यास सांगेल.
- ईडी कोर्टाकडे मल्ल्यांना अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्याची आग्रही विनंती करू शकते. इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करून जगात कोठेही अटक करण्याबाबत सांगू शकते.

मल्ल्यांच्या कंपनीने बँकेवर ठोकला ५९४ कोटींचा दावा
बंगळुरू : यूबी होल्डिंग्ज या विजय मल्ल्यांच्या कंपनीने ५ एप्रिल रोजी कर्जवसुली लवादाकडे एक याचिका दाखल केली आहे. बँकांनी युनायटेड स्पिरिटचे २६ लाख शेअर्स स्वस्तात विक्री केल्याने कंपनीचे ५९४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे याचिकेत म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, माल्यांचा सेटलमेंटचा प्रस्ताव बॅंकांनी फेटाळला