आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीपूर्वीच अर्थचक्राला घरघर; ७.१ टक्के विकास दराचा अंदाज, दरडोई उत्पन्नात १०.४ टक्के वाढ होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षातील देशाच्या विकास दराबाबतचा अंदाज शुक्रवारी सरकारने जाहीर केला. त्यानुसार विकास दर (जीडीपी) ७.१ टक्के राहील, असे भाकीत वर्तवण्यात आले. मागील आर्थिक वर्षात हा दर ७.६ टक्के   होता. विशेष म्हणजे सरकारने जाहीर केलेला ताजा अंदाज नोटबंदीचा निर्णय होण्यापूर्वीच्या आकडेवारीवर आधारित आहे. हा अंदाज व्यक्त करताना केवळ ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी विचारात घेतली असल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाने स्पष्ट केले आहे.
  
देशातील आर्थिक विकास दराच्या गणनेत महत्त्वाच्या असणाऱ्या पाचपैकी,  सेवा, उद्योग, बांधकाम आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मंदी असून केवळ कृषी क्षेत्राचा आर्थिक विकास सकारात्मक आहे. यात नोटबंदीनंतरची आकडेवारी मिसळल्यास आर्थिक विकास दर घसरण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ नोटबंदीपूर्वीच देशाचे अर्थचक्र घसरायला लागले होते. नोव्हेंबरनंतर यातील कोणत्याही क्षेत्रात सुधारणा होण्याची शक्यता नाही. चौथ्या तिमाहीमधील विकास दर ५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यामुळे एकूण विकास दर ६.२ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे काही सांख्यिकी तज्ज्ञ म्हणतात, तर विकास दर ६.९  टक्क्यांपर्यंत उतरेल, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. 

आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते विकास दर ६.५ ते ६.७ इतका राहील. याचाच अर्थ पुढील  अर्थसंकल्पात कर रचनेवर सरकारला अधिक काम करावे लागणार आहे. कररचना सुटसुटीत झाली तरच अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेऊ शकेल. जीएसटी  महत्त्वाची भूमिका बजावेल. दरम्यान, दरडोई उत्पन्नात १०.४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

नोटबंदीमुळे आणखी घसरण   
सीएसओचे मुख्य सांख्यिकी टीसीए अनंत यांनी सांगितले, आमच्याकडे केवळ ऑक्टोबरअखेरपर्यंतची आकडेवारी उपलब्ध होती, त्याच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नोटबंदीनंतरची  आकडेवारी मिसळल्यास दराचा अंदाज बदलू शकतो. विकास दराला जागतिक मंदीचाही फटका बसू शकतो, असे मत आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर बाजारात चलन तुटवडा निर्माण झाला आणि त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. बहुतांश उद्योगांनी उत्पादनात कपात केली आहे. त्याचा परिणाम पुढील तिमाहीतील आकडेवारीवर होईल.
 
 
बातम्या आणखी आहेत...