आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Good News: पीएफवर या वर्षी 9 टक्‍के व्‍याजदर मिळण्‍याची शक्‍यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-भविष्य निर्वाह निधीवर या वर्षी ९ टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून यावर ८.७५ टक्के व्याजदर मिळत आहे. या व्याजदर वाढीचा फायदा पीएफच्या पाच कोटी खातेधारकांना होणार आहे.

संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार या वर्षी ३४,८४४ कोटी रुपयांचे उत्पन्न होणार असल्याचे संचालक तथा भारतीय मजदूर संघाचे सचिव बी. जे. बनसुरे यांनी सांगितले. मात्र, नव्याने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ईपीएफओ ९ टक्के व्याजदर देण्याची घोषणा करू शकते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) वित्त लेखा तथा गुंतवणूक समितीने या आठवड्यात ८.९५ टक्के व्याजदर देण्याची शिफारस केली आहे. बनसुरे हे या समितीचे देखील सदस्य आहेत. २०१५-१६ मध्ये खातेधारकांना ८.९५ टक्के व्याज देण्यात आले तरीदेखील संघटनेकडे ९१ कोटी रुपये जास्तीचे उरत असल्याचे बनसुरे यांनी सांगितले. या महिन्याच्या शेवटी या समितीची पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये ईपीएफओच्या उत्पन्नाची आकडेवारी पुन्हा एकदा तपासून पाहण्यात येणार आहे.
या वेळी आधीपेक्षा जास्त चांगली आकडेवारी राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
सप्टेंबरमध्ये संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार खातेधारकांना ९ टक्के व्याजदर दिल्यास संघटनेला १०० कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात नव्याने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार मात्र, एवढे व्याज देऊनदेखील संघटनेच्या खात्यात अतिरिक्त १०० कोटी रुपये राहणार असल्याचा दावा बनसुरे यांनी केला आहे. त्यामुळे संघटनेच्या पुढील बैठकीत गुंतवणूक समितीच्या वतीने ९ टक्के व्याजदर देण्याची शिफारस केली जाऊ शकते.
उत्पन्न वाढल्याने व्याज देणार
ईपीएफओच्या खातेधारकांच्या पैशाच्या गुंतवणुकीतून ३४,८४४ कोटी रुपये उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता नव्याने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळेच व्याजदर जास्त देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अंतिम निर्णय अर्थमंत्रालयाचा
ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची गुंतवणूक सरकारी बाँडमध्ये करते. या वर्षी यासह शेअर बाजारात गुंवतणूक सुरू करण्यात अाली आहे. गुंतवणुकीत मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावरच खातेधारकांना व्याज देण्यात येते. गुंतवणूक समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या शिफारशीवर आधी केंद्रीय संचालक मंडळ (सीबीटी) निर्णय घेईल. त्यानंतर अर्थमंत्रालयाच्या वतीने त्याची तपासणी करण्यात येईल. ईपीएफओ आपल्या उत्पन्नातूनच खातेधारकांना व्याज देत असल्यामुळे यावर अर्थमंत्रालयाला आक्षेप असण्याचे कारण नसल्याचे मत अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे (एटक) सचिव डी. एल. सचदेव यांनी व्यक्त केले. अर्थमंत्रालयाने आधीच्या एनएससीसारख्या छोट्या बचत योजनेतील व्याजदर कमी करण्याचे संकेत दिले आहेत.