आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन खरेदीवर सवलत देण्याची योजना फायद्याचीच, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निर्णयाचे तज्ज्ञांकडून स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॅशलेस अर्थव्यवस्थेला अाणखी बळकटी देण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी रेल्वे, टाेल, पेट्राेल पंप यासारख्या ठिकाणी हाेणाऱ्या राेखरहित व्यवहारांना सवलत देण्याचे जाहीर केले अाहे. अर्थमंत्र्यांंच्या या निर्णयाचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी स्वागत केले अाहे. या सर्व सवलती ग्राहकांच्या फायद्याबराेबरच कॅशलेस अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या ठरतील, असे मत व्यक्त केले अाहे.

अाॅनलाइन विमा खरेदी स्वागतार्ह, अधिक स्पष्टता हवी
सर्वसाधारण विमा अाणि अायुर्विमा अाॅनलाइन खरेदी करण्यावर सरकारने सवलत देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह अाहे. यामुळे विमा काढताना लागणाऱ्या मध्यस्थाची गरज राहणार नाही तसेच दस्तएेवजांचे प्रमाण कमी हाेण्यास मदत हाेऊ शकेल. सध्या अाॅनलाइन विमा काढण्याचे प्रमाण कमी अाहे, पण अाता यापुढे अाॅनलाइन विमा खरेदी करण्याचे प्रमाण वाढेल. केंद्र सरकारने दिलेली ही सवलत अाॅनलाइन विमा खरेदी केलेल्या विद्यमान ग्राहकांसाठी अाहे की नवीन अाॅनलाइन विमा ग्राहकांसाठी अाहे हे स्पष्ट झालेले नाही.
- विनायक कुलकर्णी, विमातज्ज्ञ

रेल्वे प्रवाशांना विम्याचे सुरक्षा कवच मिळण्यास मदत
रेल्वेचा पास, रेल्वे तिकिटाच्या अाॅनलाइन खरेदीवर सूट देण्यामुळे तिकिटांच्या खिडक्यांवर हाेणाऱ्या रांगा कमी हाेणार अाहेत. उपनगरीय रेल्वेवर अपघात झाल्यास त्या व्यक्तीला चार लाख रुपयांचा विमा मिळताे. ही विम्याची रक्कम १२ हजार रुपयांपर्यंत वाढावी यासाठी २००८ पासून संघटनेचा प्रयत्न सुरू अाहे. पण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अाॅनलाइन तिकीट खरेदीवर १० लाख रुपयांचा विमा देण्याचे जाहीर केले असून ते नक्कीच स्वागतार्ह अाहे. यामुळे प्रवाशांना विमा कवच मिळण्यास मदत हाेणार अाहे.
- मनाेहर शेलार, संस्थापक, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघ

इंधन खरेदीवर सवलत देण्याची पहिलीच घटना
इंधनाच्या खरेदीवर सवलत देण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना असून ती नक्कीच स्वागतार्ह अाहे. नाेटबंदी झाल्यापासून पेट्रोल पंपावरील कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण अगोदरच्या २० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर गेले अाहे. या सवलतीमुळे अाता पेट्रोल पंपावरील डेबिट, क्रेडिट कार्डांच्या व्यवहाराचे प्रमाण अाणखी वाढेल. विशेष म्हणजे रिक्षा, दुचाकी यांच्यासाठीदेखील ही सवलत फायदेशीर ठरणार अाहे. विशेष म्हणजे टोलनाक्यावर डिजिटल पेमेंट केल्यास १० टक्के सवलत दिल्यामुळे टोलनाक्यावर हाेणारी गर्दी अाणि वाहनांच्या रांगा कमी हाेतील. सुट्या पैशांची चणचण कमी हाेईल.
- रवी शिंदे, अध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असाेसिएशन
बातम्या आणखी आहेत...