मुंबई - कर चुकवून काळा पैसा दडवला असल्यास दंडाची रक्कम भरून शिक्षा न हाेण्याची सवलत करबुडव्याला विद्यमान प्राप्तिकर कायद्यातून सहज मिळते; परंतु नव्या काळा पैसाविराेधी कायद्यामध्ये मात्र काेणत्याही भारतीयाने काळा पैसा विदेशात किंवा देशातही दडवला असल्यास अशा प्रकरणात काेणत्याही प्रकारची सवलत न देता थेट शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले आहे.
सध्याच्या प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७९ (२) अंतर्गत अशा प्रकारचा गुन्हा करणार्या व्यक्तीचे आचरण, स्वभाव आणि महत्त्व लक्षात घेऊन हे प्रकरण सामाेपचाराने मिटविण्याची तरतूद आहे. एखादे करचाेरी प्रकरण सामाेपचाराने मिटल्यानंतर आराेपीला दंडाच्या रकमेत किंवा तुरुंगात जाण्यापासून दिलासा मिळत हाेता. आता न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतरच समझाेत्याची चर्चा हाेऊ शकते.
जुलैपासून अंमलबजावणी
विदेशात काळा पैसा दडवून ठेवणार्या भारतीयांसाठी केंद्र सरकारने एक जुलै २०१५ पासून काळा पैसा (अघाेषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) व करआकारणी कायदा लागू केला आहे. नव्या कायद्यामध्ये विदेशात बेनामी संपत्ती असलेल्यांसाठी १२० टक्के कर आणि दंड तसेच १० वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.