आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Food Production Will Be Higher This Year: Arun Jaitley

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमी पाऊस तरी उत्पादन चांगले, पेरणीमध्ये १.७६ टक्क्याची वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - या वर्षी कमी पाऊस पडला तरीही शेतीच्या उत्पादनात वाढ होण्याची आशा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी आतापर्यंत झालेल्या लागवड क्षेत्राच्या आकडेवारीचा आधार घेतला आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ११ सप्टेंबरपर्यंत १०१२ लाख हेक्टरमध्ये खरिपाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीची या कालावधीतील आकडेवारी पाहिली, तर ९९४.४९ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यावरून या वर्षी १.७६ टक्के जास्त पेरणी झाल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीचा विचार केल्यास पेरणी चांगल्या प्रमाणात झाली असल्याचे जेटली यांनी सांगितले. त्यामुळेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगले उत्पादन होण्याची आशा आहे. मात्र, यात किती वाढ होईल ते आताच सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. असे असले तरी येत्या दोन-तीन दिवसांत पावसाची शक्यता असल्याचे जेटली म्हणाले. सर्वसामान्यपणे पडणार्‍या पावसापेक्षा या वर्षी कमीच पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचेही जेटली यांनी सांगितले.

जीएसटीचा काँग्रेसमुळे उशीर : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी काँग्रेसमुळे उशीर होत असल्याचा आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. असे असले तरी काँग्रेस याला थांबवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोपही जेटली यांनी या वेळी लावला.