आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने पोहोचले 30 हजारांवर, सराफा तेजीत, गाठला दोन वर्षांचा उच्चांक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेत आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याला शुक्रवारी झळाळी आली. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे ३५० रुपयांनी चकाकून ३०,२५० रुपयांवर पोहोचले. सोन्याच्या किमतीचा हा दोन वर्षांतील उच्चांक आहे. औद्योगिक क्षेत्रातून चांगली मागणी आल्याने चांदीही तेजीने चकाकली. चांदी किलोमागे ६०० रुपयांनी वाढून ४१,६०० रुपयांवर पोहोचली. सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी अाली.

सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले, सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सोन्याला चांगली मागणी आहे. त्यातच जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेतामुळे मौल्यवान धातूला तेजीची झळाळी आली आहे. जागतिक स्तरावर डॉलर १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्याने सोने खरेदीला जोर आला आहे. हा आठवडा सोन्यासाठी उत्तम राहिला. फेब्रुवारीनंतर या आठवड्यात सोन्याच्या किमतीत अशी तेजी दिसून आली. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) १२७४.२४ डॉलरवर पोहोचले. गुरुवारी येथे सोने औंसमागे १२६६.२६ डॉलर होते. दिल्ली सराफा बाजारात तेजीमुळे सोने १३ मे २०१४ नंतर प्रथमच ३० हजारांवर पोहोचले. मागील दोन सत्रांत सोन्याने तोळ्यामागे ३२५ रुपयांची कमाई केली.

सुवर्ण कमाई योजनेत मंदिरांकडून १५१२ किलो सोने ठेव : सुवर्णकमाई योजनेअंतर्गत देशातील विविध मंदिरे आणि ट्रस्टने आतापर्यंत १५१२ किलो सोने बँकांत जमा ठेव केले आहे. सरकारने नोव्हेंबरमध्ये ही योजना जाहीर केली होेती. या योजनेमुळे सोने आयातीवर परिणाम झाल्याचे सांगणे तूर्तास घाईचे राहील, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केले. लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सिन्हा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सुवर्ण कमाई योजना (गोल्ड मोंटायझेन स्कीम- जीएमएस) पाच नोव्हेंबर २०१५ पासून सुरू झाली आहे. या योजनेमुळे गेल्या सहा महिन्यांत सोने आयातीचे प्रमाण २०१४-१५ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या घटले अाहे.

मुद्राकडून ३२८७ कोटींचा वित्तपुरवठा
सिन्हा यांनी सांगितले, मुद्राकडून ३१ मार्चअखेर विविध वित्तपुरवठा संस्था, सार्वजनिक बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना ३,२८७ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा केला आहे. बँकांच्या विलीनीकरणाबाबत कार्यकारी मंडळाकडून योग्य प्रस्ताव अाल्यास सर्वांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. पायाभूत क्षेत्र, स्टील, वस्त्रोद्योग आदी क्षेत्रांत अनुत्पादक कर्जाचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी योग्य ती पावले टाकण्यात येतील.