आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने २५ हजारांखाली, वर्षभरात २० हजारांखाली येण्याचा बुलियनचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ औरंगाबाद- वर्षभरापासून घसरणीच्या घाटात अडकलेला सोन्याचा किमतीचा रथ, गुरुवारी आणखी घसरला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ४० रुपयांनी घसरून २४,९८० झाले. चार वर्षांनंतर प्रथमच सोन्याच्या किमतीने हा स्तर गाठला आहे. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात तर सोने साडेपाच वर्षांच्या नीचांकी पातळीत आले आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात व्याजदर वाढीची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदार सोन्यापासून दूर जात असल्याचे मत बुलियन तज्ज्ञांनी व्यक्त केले. दरम्यान, इंटरनॅशनल जर्नल फॉर बुलियन इंडस्ट्रीच्या (बुलियन बुलेटिन) मते, येत्या सहा ते १२ महिन्यांत सोने तोळ्यामागे २० हजारांखाली येण्याची शक्यता आहे.
दिल्ली सराफ्यात सोने महिन्यापूर्वी २६ हजारांच्या आसपास होते. आता सोने तोळ्यामागे २५ हजारांखाली आले आहे. तिकडे सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) १०८५.०८ डॉलरपर्यंत घसरले. हा साडेपाच वर्षांचा नीचांक आहे. दिल्लीतील राकेश आनंद या सराफ व्यापाऱ्याने सांगितले, मजबूत होणारा डॉलर, अमेरिकेतील संभाव्य व्याजदर वाढ आणि घटलेली मागणी यामुळे सोन्याची चकाकी हरवली आहे. देशातील रिटेलर्स व ज्वेलर्सकडूनही सोन्याची मागणी घटली आहे.

किमती ५०% घसरण्याची शक्यता
इंटरनॅशनल जर्नल फॉर बुलियन इंडस्ट्रीने (बुलियन बुलेटिन) येत्या सहा ते १२ महिन्यांत सोने तोळ्यामागे २० हजारांच्या खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे. ही घसरण सध्याच्या पातळीच्या सुमारे २० टक्के तर अव्वल पातळीपासून ५० टक्के राहील. २०१३ मध्ये सोन्याच्या किमती तोळ्यामागे ३५ हजारांच्या आसपास होत्या. अमेरिकेत सप्टेंबरपासून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच चीनमधून मागणी घटल्याने सोन्यातील घसरण सुरूच राहील, असे बुलियन बुलेटिनने म्हटले आहे.
बाय ऑन डीप नियमाप्रमाणे खरेदी करावी
सध्याच्या सोन्याच्या किमतीतील चढ-उतार लक्षात घेता सजगपणे गुंतवणूक करावी. थांबा व वाट पाहा धोरण अवलंबवावे. समजा ५ तोळे खरेदी करायचे असेल तर प्रत्येक घसरणीला थोडे थोडे खरेदी करावे.
विश्वनाथ बोदाडे, सहायक उपाध्यक्ष, एलकेपी सेक्युरिटीज.

घसरणीची कारणे
- अमेरिकेत सप्टेंबरमध्ये होणारी संभाव्य व्याजदर वाढ.
- चीनमधून घटलेली मागणी.
- आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा वधारलेला भाव.
- देशातील घटलेली मागणी.
- शेअर बाजारातील तेजीतील सातत्य
ईटीएफकडून जोरदार विक्री
जगातील सर्वात मोठा सोने ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) एसपीडीआरकडील ठेवी घटून २१४.७ लाख टनांपर्यंत घसरल्या आहेत. हा ७ वर्षांचा नीचांक आहे. ईटीएफमधील विक्रीमुळे गुंतवणूकदार सोन्यातून पैसा काढत असल्याचे स्पष्ट होते. मागणी कमी आणि पुरवठा जास्त या चक्रात सोने सापडल्याने घसरण होत आहे.

चांदीचा पाच वर्षांचा नीचांक
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी चांदी किलोमागे १०० रुपये वाढून ३३,८०० झाली. औद्योगिक क्षेत्रातून आलेल्या मागणीमुळे चांदीला काही प्रमाणात आधार मिळाला. पाच दिवसांपूर्वी चांदी ३४,३०० रुपयांवर होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी पाच वर्षांच्या नीचांकी पातळीत आहे.