आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्रिसलर’ वाढविणार वाहन निर्मितीचे उद्दिष्ट, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यास चांगला प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्यास चांगला प्रतिसाद मिळत असून वाहन निर्मितीतील आघाडीच्या क्रिसलर समूहाने महाराष्ट्रातील आपले उत्पादन दुपटीने वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच जनरल मोटर्स उद्योग समूहानेही महाराष्ट्रात वाढीव गुंतवणूक करण्यात रस दाखविला आहे.

डेट्रॉइट येथील जनरल मोटर्स आणि क्रिसलर या वाहन निर्मिती उद्योगातील आघाडीच्या समूहांच्या मुख्यालयास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्या वेळी सकारात्मक वातावरणात चर्चा झाली. क्रिसलर उद्योग समूहाचे अध्यक्ष माईक मॅन्ले यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जीप हा प्रसिद्ध ब्रँड तयार करणारा क्रिसलर समूह महाराष्ट्रात फियाट क्रिसलर ऑटोमोबाइल्सच्या माध्यमातून यापूर्वीच कार्यरत आहे. समूहाच्या पुण्याजवळच्या रांजणगाव येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता दुप्पट करून २०१८ पर्यंत २ लाख ४५ हजार वाहनांची निर्मिती केली जाईल, असे मॅन्ले यांनी या भेटीत सांगितले.

जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष मॅट हॉब्ज आणि मुख्य अर्थतज्ज्ञ जी. मुस्तफा मोहतरेन यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. हा उद्योगसमूह राज्यात अधिक गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. नवीन वाहनांच्या आराखड्यांच्या निर्मितीच्या अनुषंगाने जनरल मोटर्स राज्यातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याबाबत विचार करीत आहे. तसेच नियमित वाहन निर्मितीशिवाय महामार्गावरील संपर्क यंत्रणेबाबतच्या तंत्रज्ञान निर्मितीत या समूहास रस आहे. त्यादृष्टीने चर्चा झाली.

राज्यात कुशल मनुष्यबळ
न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘मुंबई मीट्स मॅनहॅटन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सर्वांना देशाप्रती आपले कर्तव्य बजावण्याची वेळ असल्याचे आवाहन केले. आम्ही देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्रात सध्या निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही २५ वर्षे वयोगटाखालील असल्याने त्यांना कौशल्यधारित शिक्षण देऊन राज्यात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योग-व्यापारासाठी अनुकूल स्थिती
डेट्रॉइट येथील महाराष्ट्र मंडळ आणि बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित महाराष्ट्र व्यापार विकास परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उद्योगस्नेही वातावरण, तणावमुक्त परिस्थिती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या उत्तम स्थितीमुळे राज्यात उद्योग-व्यापारासाठी अतिशय अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि मिशिगन प्रांत मानव संसाधन आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्यासाठी एकत्र आल्यास आपण खूप काही करू शकतो, असा आशावाद व्यक्त करतानाच या प्रांताच्या परिपूर्ण विकासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मिशिगनचे गव्हर्नर रिचर्ड स्नायडर यांची प्रशंसा केली.