आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व विमान कंपन्यांना एफडीआयचा फायदा नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विमान वाहतूक कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून १०० टक्के करण्यात आली असली तरी या कंपन्यांना विदेशी गुंतवणूक मिळवणे अवघड होणार आहे. याचे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय कायदा आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन - आयसीएओ) नियमानुसार विमान वाहतूक कंपनीचे नियंत्रण विदेशातून होत असेल तर अशा कंपन्यांना आंतरराष्ट्रीय वाहतुकीची परवानगीच देता येत नाही. नागरी उड्डयन सचिव राजीव नयन चौबे यांनी असोचेमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ही माहिती दिली.

कोणत्याही कंपनीमध्ये ४९ टक्क्यांपेक्षा जास्त एफडीआय असेल तर विदेशात उड्डाण घेण्यासाठी द्विपक्षीय अधिकारात अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र, देशांतर्गत सेवा देणाऱ्या कंपन्यांना प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला कोणतीच मर्यादा नाही. या संदर्भात इतर देशांमध्ये असलेल्या धोरणांचादेखील अभ्यास केला जात असल्याची माहिती चौबे यांनी दिली.

सरकारने सोमवारीच विमान वाहतूक सेवेत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून १०० टक्के करण्यात आल्याची घोषणा केली होती. या कंपन्यांना ४९ टक्के ऑटोमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नसून सरळ गुंतवणूक केली जाऊ शकते. यापेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी आवश्यक असेल. विदेशी विमान वाहतूक कंपन्यांसाठी मात्र ४९ टक्के मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...