आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर निर्यातीवर टनामागे 4000 सबसिडी; यंदा साखर उत्पादनात मोठ्या वाढीचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारने कच्च्या साखरेच्या निर्यातीवरील सबसिडीला मंजुरी दिली आहे. हे अनुदान २०१४-१५ या विपणन वर्षासाठी ४४ लाख टन कच्च्या साखरेच्या निर्यातीवर मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक बाबींशी संबंधित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. निर्यात साखरेवर टनामागे 4000 रुपये अनुदान मिळणार आहे.
मागील वर्षी सरकारने ४० लाख टन कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाची घोषणा केली होती. तेव्हा टनामागे ३,३७१ रुपये अनुदान देण्याचे ठरले होते. मात्र, ही योजना सप्टेंबरमध्ये संपली. साखर कारखानादारांची संघटना इस्माने सांगितले, गळीत हंगाम आणखी एक ते दीड महिना चालणार आहे. कारखान्यांना १४ लाख टन साखरेची निर्यात साधण्यासाठी गतीने गळीत करावे लागणार आहे. इस्माने यंदा २६० लाख साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मागील हंगामात २४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा खप २४८ लाख टन होण्याची शक्यता आहे.
बटाट्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले
नवी दिल्ली : बटाट्याचा पुरवठा वाढण्यासाठी सरकारने बटाट्यावरील किमान निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी देशातील बाजारपेठांत बटाट्याचे भाव वाढल्यानंतर सरकारने बटाटा निर्यातीसाठी टनामागे ४५० डॉलरचे मूल्य लावले होते. म्हणजेच या किमतीच्या खाली बटाटा निर्यात करणे शक्य नव्हते.
किमती घसरल्या-
साखर उद्योगातील संघटना इस्माच्या मते, साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांची १२ हजार कोटींहून जास्त थकबाकी आहे. अशात सरकारने कारखानदारांना दिलासा देण्यासाठी साखर निर्यातीवरील अनुदानाच्या घोषणेला विलंब लावल्यामुळे साखरेच्या किमती घसरल्या आहेत. सध्या देशभरात ५०० साखर कारखाने सुरू आहेत, त्यापैकी १७१ कारखाने महाराष्ट्रातील असून त्यातील ९९ सहकारी आहेत. विशेष म्हणजे, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखर उत्पादक आहे.