आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Hikes Excise Duty On Petrol By 37 Paise Per Litr

जनतेचा लाभ सरकारी खिशात, पेट्रोल उत्पादन शुल्कात ३७ पैशांची वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ३७ पैसे तर डिझेलवरील शुल्कात २ रुपये प्रतिलिटर एवढी वाढ केली आहे. अर्थात त्यामुळे किरकोळ भाव वाढणार नाहीत. एक जानेवारीला पेट्रोल ६३ पैशांनी तर डिझेल १.०६ रुपयांनी स्वस्त झाले होते. म्हणजेच सरकारने पुन्हा एकदा आपला फायदा हिरावून घेतला आहे. दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर ५९.३५ रुपये आणि डिझेलचा दर ४५.०३ रुपये प्रतिलिटर आहे.
उत्पादन शुल्कातील या वाढीमुळे सरकारला मार्चपर्यंत जवळपास ४ हजार ४०० कोटी रुपयांचे जास्तीचे उत्पन्न मिळेल. सरकारने फक्त १८ दिवसांत दुसऱ्यांदा आणि दोन महिन्यांत तिसऱ्यांदा शुल्कवाढ केली आहे. तिसऱ्यांदा वाढ करून सरकारने स्वत:साठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारला २०१४-१५ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांपासून ९९ हजार १८४ कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क मिळाले होते. या वर्षी पहिल्या तिमाहीत ३३ हजार ४२ कोटी रुपये मिळाले आहेत.

सामान्य पेट्रोलवर मूळ उत्पादन शुल्कात ७.३६ रुपयांवरून ७.७३ रुपये प्रति लिटर एवढी, तर डिझेलवर ५.८३ रुपयांवरून ७.८३ रुपये प्रति लिटर एवढी वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त आणि विशेष उत्पादन शुल्क मिळून सामान्य पेट्रोलवर एकूण उत्पादन शुल्क १९.३६ रुपयांवरून वाढवून १९.७३ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. डिझेलवर ते ११.८३ रुपयांवरून वाढून १३.८३ रुपये प्रति लिटर झाले आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा फायदा घेत नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ दरम्यानही सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात चा वेळा वाढ केली होती. त्या वेळी पेट्रोलवरील एकूण शुल्क ७.७५ रुपयांनी तर डिझेलवरील शुल्क ६.५० रुपयांनी वाढले होते. त्यामुळे सरकारला २० हजार कोटी रुपयांची जास्त कमाई झाली होती.

अशा प्रकारे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सात वेळा पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १०.०२ रुपयांनी तर डिझेलवरील शुल्क ९.९७ रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होऊनही सामान्य लोकांना त्याचा फायदा मिळू शकला नाही. कच्चे तेल सध्या ११ वर्षांच्या खालच्या स्तरावर आहे.

क्रूड ५७% स्वस्त, पेट्रोल फक्त ७.६%
एनडीए सरकारने नोव्हेंबर २०१४ पासून उत्पादन शुल्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्या वेळी भारतीय बास्केट क्रूडचे दर ५१९८.१० रुपये प्रति बॅरल होते. आता ते २२३४.०८ रुपये आहे. त्या वेळी पेट्रोल ६४.२४ रुपये आणि डिझेल ५३.३५ रुपये प्रति लिटर होते. म्हणजे क्रूड ५७% स्वस्त झाले, पण पेट्रोलच्या दरात फक्त ७.६% आणि डिझेलचे दर १५.६% घट झाली आहे.

- १७ डिसेंबर २०१५ ला पेट्रोलवरील कर ०.३० पैसे, डिझेलवरील कर १.१७ रुपयांनी वाढला होता. सरकारला २५०० कोटींची अतिरिक्त कमाई होईल.
- ७ नोव्हेंबर २०१५ ला पेट्रोलवरील कर १.६० रुपये आणि डिझेलवरील कर ३० पैशांनी वाढवून सरकारने ३२०० कोटी रुपयांची तरतूद केली होती.