आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय टॉवर धोरण लागू करा : कंपन्यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्यांना कॉल ड्रॉपची समस्या लवकर संपुष्टात आणण्याचे निर्देश दिले होते, परंतु कंपन्यांनी तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत कॉल ड्रॉपची समस्या कमी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. उलट आमच्या समस्या दूर केल्या गेल्या नाहीत तर आगामी काळात कॉलड्रॉपच्या समस्या वाढू शकतात, असा इशारा टेलिकॉम कंपन्यांनी दिला आहे. दूरसंचार क्षेत्र आवश्यक सेवा म्हणून घोषित करण्याची, तसेच राष्ट्रीय टॉवर धोरण लागू करण्याची मागणी कंपन्यांनी केली आहे.

सरकारने टेलिकॉम कंपन्यांना कॉलड्रॉपची समस्या लवकर संपवण्याचे आवाहन केले होते. परंतु सरकारच्या या दबावाचा कंपन्यांवर काहीही परिणाम झालेला नाही. सरकारच्या दबावाला उत्तर देण्यासाठी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) असोसिएशन ऑफ युनिफाइड टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर ऑफ इंडिया (एयूएसपीआय) व टॉवर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स असोसिएशन (टीएआयपीए) यांनी सोमवारी संयुक्त परिषद घेतली. त्यात व्होडाफोन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ सुनील सूद म्हणाले की, ऑपरेटर्स व टॉवर कंपन्यांना भेडसावत असलेल्या समस्यांवर तोडगा काढला नाही तर भविष्यात कॉलड्रॉपचे संकट कमी होण्याऐवजी वाढू शकते. दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी जादा मोबाइल टॉवर लावण्याचे समर्थन केले आहे.

युनिनॉरने कॉल ड्रॉपच्या परिस्थितीत ग्राहकांना एक कॉल नि:शुल्क देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत दुसऱ्या कंपन्याकडे विचारणा केली असता कुणीही हो किंवा नाही अशा स्वरुपात उत्तर दिले नाही. तो त्या कंपनीचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारती एअरटेलचे भारत व दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ गोपाल विठ्ठल यांनी कॉलड्रॉपच्या माध्यमातून कंपन्या त्यांचा महसूल वाढवत असल्याचा आरोप फेटाळून लावला. हा आरोप निराधार व बिनबुडाचा असल्याचे ते म्हणाले. आमच्या कंपनीकडून कॉलच्या परिस्थितीवर दररोज लक्ष ठेवले जाते व सर्व क्षेत्रांकडून त्याचा अहवाल घेतला जातो. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर टॉवर उभारणीचे धोरण नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी देशभरात एकसमान शुल्क असले पाहिजे. त्याच बरोबर ग्राहक स्पेक्ट्रमची उपलब्धताही वाढली पाहिजे. आयडिया सेल्युलरचे एमडी मितांशु यांनीही देशात एकसमान टॉवर धोरणाचा पुरस्कार केला.
१० हजार टॉवर ठप्प
दूरसंचार कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, मुंबईसह चंदिगड, बंगळुरू, हैदराबाद, पाटणा, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त टॉवर विविध कारणांसाठी बंद आहेत. त्याचा फटका दूरसंचार सेवेला बसत असून कॉल ड्रॉपची समस्या वाढत आहे.