आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेचा वायदेबाजार बंद करण्याची चिन्हे, कृत्रिम दरवाढीवर उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वायदेबाजारातील साखरेच्या खरेदी-विक्रीमुळे साखर दरात कृत्रिम तेजी-मंदी आणली जात असल्याने साखरेच्या वायदेबाजारावर बंदी आणण्याच्या हालचाली केंद्रात सुरू झाल्या आहेत. सणांचा हंगाम तोंडावर असताना साखर दरवाढीचा फटका बसू नये याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जात आहे.
वायदेबाजारामुळे साखर कारखाने, ऊस उत्पादक आणि सर्वसामान्य ग्राहकांचे नुकसान होत असल्याची तक्रार होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी तशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली होती. त्यानुसार जेटली यांनी नुकतीच यासंदर्भात बैठक घेतली.
काही दिवसांपासून किरकोळ बाजारातील साखरेचे दर ४० रुपयांच्या पुढे गेले आहेत. अागामी सणांच्या पार्श्वभूमीवर वायदेबाजारामुळे साखरेच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी साखरेच्या वायदेबाजारावर सेबीचा नियंत्रक नेमण्याची सूचना केली आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
गेल्या वर्षी देशात २ कोटी ८३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. दुष्काळामुळे यंदा हे उत्पादन दोन कोटी ३० लाख टनांपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे. देशाची साखरेची वार्षिक गरज सुमारे २ कोटी ६० लाख टन आहे. मागणी आणि उत्पादनातील संभाव्य तफावत लक्षात घेऊन दरवाढ टाळण्यासाठी सरकार आतापासूनच पावले उचलू लागले आहे. स्थानिक बाजारातील आवक टिकून राहण्यासाठी साखरेवर २० टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णयही नुकताच घेण्यात आला आहे.
वायदेबाजारामुळे माेठे नुकसानच
^‘वायदेबाजाराचा साखर कारखान्यांना विशेष फायदा हाेत नाही तर सटोडियांना होतो. ते साखरेची आधीच खरेदी करून नंतर फ्यूचर मार्केट वाढवतात. गेल्या वर्षी १८०० ते २०००० रुपये क्विंटल दराने कारखान्यांनी साखर विकली. आता कारखाना स्तरावर सुमारे ३३०० रुपये क्विंटल दर, मात्र रोज टेंडर निघूनही साखरेला उठाव नाही. कारखान्यांकडे साखर शिल्लक आहे. वायदेबाजार बंद झाल्यास दरातील चढ- उतार थांबेल.’
शिवाजीराव नागवडे, अध्यक्ष, राज्य सहकारी साखर कारखाना संघ.
तेजी-मंदी बंद हाेऊन ग्राहकांचाच फायदा
^‘ वायदेबाजारावर बंदीचा निर्णय झाला तर साखरेतली तेजी-मंदी कमी होईल. वायदे बाजारातल्या सटोडियांवर कसलेही नियंत्रण नसल्याने साखरेचे मार्केट पाडण्याचे प्रकार घडतात. वास्तविक साखरेच्या खपात अचानक वाढ किंवा घट होत नाही. मागणीत नियमितता असते. तरीही वायदेबाजारामुळे तेजी-मंदी येते. साखरेला वायदेबाजारातून बाहेर काढल्याचा फायदा सर्वसामान्य व्यापारी आणि ग्राहकांना होईल.’
वीरकुमार शहा, अध्यक्ष, महाराष्ट्र शुगर ब्रोकर्स असोसिएशन.
‘गेल्या काही वर्षांत बहुराष्ट्रीय कंपन्या वायदेबाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असल्याने साखर दरात तब्बल बाराशे रुपये प्रतिक्विंटल चढ- उतार झाली. यामुळे साखर उद्योगास वर्षभरात १५ हजार कोटींचा फटका बसला. दुसरीकडे दर पाडून व पुन्हा वाढवून काही सटोडियांनी हजार कोटी रुपये कमावले. वायदेबाजारात दर पाडून कमी दरात कारखान्यांकडून लाखो टन साखर खरेदी करायची आणि नंतर बाजारात दर वाढल्यावर ती विकायची, असा प्रकार चालतो. वायदेबाजारात वर्षभरात ५५ लाख टन साखरेचा व्यवहार झाला. यातल्या अवघ्या ६० हजार टन साखरेचे प्रत्यक्ष व्यवहारात रूपांतर झाले. अनेक बेनामी व साखर व्यवसायाशी संबंध नसलेल्या कंपन्या वायदा बाजारात व्यवहार करतात. याची चौकशी झाल्यास घोटाळा समोर येईल.’
योगेश पांडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
बातम्या आणखी आहेत...