आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भ्रामक जाहिराती : सेलिब्रिटीवरही बंधने लागण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यापुढील काळात कोणत्याही सेलिब्रिटीला एखाद्या उत्पादनाची जाहिरात विचार करूनच करावी लागणार आहे. जाहिरातीत देण्यात आलेली माहिती दिशाभूल करणारी (भ्रामक) आहे, या संबंधीची माहिती सेलिब्रिटीला आधीच होती, हे सिद्ध झाल्यास त्यावर बंदी घातली जाऊ शकते. अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. उद्योग संघटना असोचेमच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

या संबंधी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने ऑगस्ट महिन्यात ग्राहक व्यवहार मंत्रालयाला अशा प्रकरणाबाबत इतर देशांच्या कायद्यांचा अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यानंतर या संबंधीच्या विधेयकात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. ग्राहक सुरक्षा कायदा २०१५ नावाने हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. हा कायदा मंजूर झाल्यास ३० वर्षांपूर्वीचा कायदा रद्द होऊन हा नवीन कायदा अस्तित्वात येणार आहे. त्या व्यतिरिक्त संसदेच्या स्थायी समितीने देखील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती (भ्रामक) करणाऱ्या सेलिब्रिटींवर ५० लाख रुपयांचा दंड तसेच पाच वर्षांपर्यंत कारावास अशी शिक्षा करण्याची शिफारस केली होती.

इतर देशांमध्ये असलेल्या कायद्याचा अभ्यास पूर्ण झाला असून यात काही देशांमध्ये दंड करण्याची तरतूद आहे. तर काही देशांमध्ये पहिल्या चुकीवर तीन वर्षे तर पुन्हा दोषी आढळल्यास आजीवन बंदीचा नियम आहे. या सर्वांवर सध्या विचार करण्यात येत आहे. या संबंधी लवकरच मंत्रिमंडळ नोट तयार करण्यात येणार आहे. स्थायी समितीने केलेल्या कारावासाच्या तरतुदीसंबंधी काहीही बोलण्यास पासवान यांनी नकार दिला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मॅगीच्या वादामुळे चर्चा
भ्रामक जाहिरातींचा मुद्दा बराच जुना असला तरी या वर्षी मॅगी प्रकरणामुळे त्यावर जास्त चर्चा झाली. बंदी असलेल्या अंतर्भूत वस्तूंमुळे मॅगीवर बंदी घालण्यात आल्यावर जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटीवर देखील कारवाई करण्याची मागणी झाली, तर आणखी एक ताजे उदाहरण रिअल इस्टेट संस्था आम्रपालीची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचे आहे. फ्लॅट खरेदी करणाऱ्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना जाहिरातीतून बाहेर पडावे लागले. या आधी फेअरनेस क्रीमची शाहरुख खानची जाहिरात देखील वादात अडकली होती. आंब्याच्या झाडाला दगड मारताना दिसलेल्या अमिताभ बच्चन यांच्याही कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीला बंद करावे लागले हाेते. मुले त्यांचे अनुकरण करण्याची शक्यता आहे, असे मत जाहिरात परिषदेने व्यक्त केले होते.

भेसळीशिवाय खाद्यपदार्थ
नवीन कायद्यात भेसळ करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाईची तरतूद असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. इतर देशांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्याची कल्पना देखील करू शकत नाही, तर भारतात आपण भेसळीशिवाय खाद्यपदार्थांची कल्पना करू शकत नाही. त्यामुळे विदेशात भारतीय देखील भारतातील उत्पादने विकत घेत नाहीत. त्यामुळे भेसळ थांबवण्यासाठी उद्योगांनीही विशेष करून खाद्य तसेच औषधांबाबतची ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन पासवान यांनी केले.

चीनमधून आयातीवर बंदी
चीनमधील आयातीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर पासवान यांनी सांगितले की, सरकारने बीआयएस कायदा तयार केला आहे. जगातील कोणत्याही देशातून खराब क्वाॅलिटी असलेले सामान आयात करण्यास किंवा विक्री करण्याविरोधात नियम बनवण्यात येत आहे. बीआयएस कायद्यामुळे अशा सामानावर बंदी येईल. राष्ट्रीय तसेच लोकांच्या हिताच्या सर्व वस्तूंना बीआयएस प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...