नवी दिल्ली - साखरेची निर्यात करण्यासाठी दीर्घकालीन धोरण ठरवण्यावर काम सुुरू आहे. यामध्ये चीन आणि आफ्रिकाच नाही, तर इतर देशांतही साखर निर्यातीवर विचार सुरू आहे. खाद्य सचिव वृंदा सरूप यांनी पीएचडी चेंबरच्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. मात्र, हे धाेरण कधीपर्यंत लागू होईल हे त्यांनी सांगितले नाही.
देशात सलग पाच वर्षांपासून साखरेचे उत्पादन देशांतर्गत मागणीपेक्षा जास्त होत आहे. या वेळीदेखील गेल्यावर्षीच्या तुलनेत उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. भारतीय साखर उद्योजक असोसिएशनच्या अंदाजानुसार देशात २.८० कोटी टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. २०१४-१५ मध्ये देशात २.८३ कोटी टन साखरेचे उत्पादन झाले होते. ऑक्टाेबरपासून नवीन साखरेचे उत्पादन सुरू होईल. तोपर्यंत एक कोटी टन अतिरिक्त साखरेचा साठा जमा होण्याचा अंदाज आहे. साखरेचे दरदेखील कमी होत आहेत.