आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय डाळ व्यापाऱ्यांनी विदेशात केली साठेबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - साठेबाजी, वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या पैशात वाढ आणि कमी उत्पादनामुळे डाळीच्या किमती वाढल्या असल्याचे ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. विशेष म्हणजे मोठे डाळ व्यापारी (ट्रेडर्स) भारत ज्या देशातून डाळींची आयात करतो, त्या देशातच साठेबाजी करत असल्याची माहिती रामविलास पासवान यांनी या वेळी दिली. वास्तविक कायद्यानुसार देशात साठेबाजी करणाऱ्यांवरच कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

देशात २०१३-१४ मध्ये १९२.५ लाख टन डाळींचे उत्पादन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मान्सून खराब झाल्यामुळे २०१४-१५ मध्ये डाळींचे उत्पादन घटले असून ते १७२ लाख टनांवर आले आहे.

अनेक राज्यांमध्ये डाळींची साठेबाजी होत असल्याचे पासवान यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने ८६ हजार टन डाळी जप्त केल्या आहेत. अशा पद्धतीने तामिळनाडू सरकारच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात डाळी जप्त करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या वतीने देखील अशा साठेबाजांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
आतापर्यंत १४ राज्यांमध्ये १४,१३४ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून त्यातून १,३०,६०६ टन डाळी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील ५१,७३२ टन डाळी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. असे असले तरी बाजारातील डाळींच्या किमती फारशा कमी झालेल्या नाहीत. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीच्या बाजारात तूरडाळ १६७ रुपये प्रतिकिलो, उडीद डाळ १४७ रुपये प्रतिकिलो, मूगडाळ १०४ प्रतिकिलो तर मसूर डाळ ९२ रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.
वार्षिक ९ लाख टन जास्त मागणी
गेल्या चार दशकांत डाळींच्या उत्पादनात १८.५ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या याच्या अनेक पटींनी वाढली आहे. देशात प्रत्येक वर्षी नऊ लाख टन डाळींची मागणी वाढली आहे, तर दुसरीकडे उत्पादन घटले आहे. याचा फायदा साठेबाज उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
विदेशात साठेबाजी
देशातील काही मोठे ट्रेडर्स आणि आयातक विदेशात डाळींची साठेबाजी करत असल्याची माहिती सरकारला मिळाली असल्याचे पासवान यांनी सांगितले. मात्र, सरकारला फक्त देशात साठेबाजी करणाऱ्यांवरच कारवाई करता येऊ शकते. खाद्य पदार्थांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी वेगळी यंत्रणा बनवण्याचा सरकारचा कोणताच विचार नसल्याचे पासवान यांनी सांगितले.
इतर देशांत घट
फक्त भारतातच नाही, तर इतर देशांत देखील डाळींच्या उत्पादनात घट झाली असल्याची माहिती पासवान यांनी दिली. त्यामुळेच डाळी आयात करण्यात अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात मुखत्वे कॅनडा, अाफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमारमधून डाळी आयात करण्यात येतात. आता या देशांत डाळींचे उत्पादन कमी झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...