आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोषण ‘एचआरएक्स’चा व्यवसाय ५०० कोटींवर नेणार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनने आपला फॅशन ब्रॅन्ड "एचआरएक्स'चा विस्तार करण्याची योजना आखली असून आगामी दोन वर्षात कंपनीचा व्यवसाय ५०० कोटींवर नेण्याचे ठरवले आहे. यासाठी हृतिक रोशन शेअर बाजारात उतरणार असल्याची माहिती हृतिकच्या कंपनीतील अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’ला दिली.

गेल्या काही वर्षांत बॉलीवूड कलाकारांनी चित्रपटाव्यतिरिक्त अन्य उद्योगांमध्येही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कलाकार जे कपडे वापरतात तसेच कपडे वापरण्याचा प्रयत्न कलाकारांचे चाहते करतात. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या ब्रॅन्डच्या प्रचारासाठी कलाकारांना मोठी रक्कम देऊन साइन करतात. कंपन्यांना याचा फायदा झाल्याचे लक्षात आल्यानंतर कलाकारांनी स्वतःचे ब्रॅन्डिंग सुरू केले. सलमान खानने बीइंग ह्युमन या एनजीओच्या माध्यमातून स्वतःचा फॅशन ब्रॅन्ड सुरू केला. याला चांगलाच प्रतिसाद मिळाला. हृतिक रोशननेही दोन वर्षांपूर्वी एचआरएक्स नावाने स्वतःचा कपड्यांचा ब्रॅन्ड सुरू केला.
मात्र, ब्रॅन्डला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने आता स्वतः कपड्यांची निवड करण्याकडे लक्ष घातल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली. एचआरएक्सचे समर कलेक्शन लवकरच बाजारात येणार असून हृतिक स्वतः कपड्यांच्या निवडीकडे लक्ष देत आहे. एचआरएक्स ब्रॅन्ड आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला जाणार असून व्यवसाय वाढीसाठी हृतिक शेअर बाजारातही उतरण्याचा विचार करत असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली. एचआरएक्सच्या अंतर्गत आता हृतिकची कंपनी इनर वेअर, दाढी करण्याची उत्पादने, जिमचे कपडे आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटही तयार करणार आहे. हृतिक रोशन आता आरोग्य, शिक्षण, फिटनेस आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या स्टार्टअप कंपन्यांमध्येही गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...