आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत- चेक गणराज्यातील व्यापार १ अब्ज युरोने वाढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- केंद्र सरकारचे धोरण उद्योगवाढीला पूरक आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत भारत आणि चेक गणराज्य यांच्यातील व्यापार एक अब्ज युरोने वाढेल, असे मत भारत-चेक संयुक्त चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनजित मलिक यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चेक गणराज्याचे व्यापार प्रतिनिधी शिष्टमंडळ भारतातील विविध शहरांना भेटी देणार आहे, असेही ते म्हणाले.

मलिक म्हणाले, ‘वाहन, सुटे भाग, नागरी विमान वाहतूक, शिक्षण, रसायने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांत उभय देशांतील सहकार्य आगामी काळात वाढणार आहे. सध्या उभय देशांत व्यापार २.५ अब्ज युरो (१४०० कोटी रुपये) प्रतिवर्ष इतका आहे. आता तो ४.४ अब्ज युरो होण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने मांडलेली नवी परकीय व्यापार नीती याला पोषक वातावरणनिर्मिती करेल, असा विश्वास आहे. भारतात यापुढे गुंतवणूक आणि व्यापार करणे सुटसुटीत व सुरक्षित होईल. इन्फोसिस, अशोक लेलँडसारख्या कंपन्या यापूर्वीच आमच्या देशात दाखल झाल्या आहेत. आता आमच्या कंपन्याही भारतात दाखल होतील, असे ते म्हणाले.

नागपूरनजीक विमान देखभाल केंद्र
नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सहकार्याला खूप वाव आहे. गुरगावमध्ये याबाबतचे प्रशिक्षण केंद्र यापूर्वीच स्थापन केले आहे. येत्या काळात दक्षिणेकडील राज्यांत व नागपूर परिसरात विमान देखभाल केंद्र स्थापन करण्याचा विचार आहे. बोइंग कंपनी असल्याने नागपूरला प्राधान्य मिळू शकते. आमच्याकडे दहा आसनी क्षमतेची विमाने आहेत. ती विशिष्ट प्रकारच्या हिरवळीवर उतरू शकतात. भारतातील छोट्या शहरांचा विचार करता अशा विमानसेवेचा विस्तार होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...