आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतातून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या कापसाच्या निर्यातीवर संकट वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/कराची - भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढल्यामुळे दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या कापसाच्या व्यापारावर संकट येण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये दरवर्षी कापसाचा ८२.२ कोटी डॉलरचा (सुमारे ५,४८१ कोटी रुपये) व्यापार होतो. यामुळे पुरवठ्यासंदर्भात व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यांनी सध्यातरी नवीन सौदा करणे थांबवले आहे. सीमेवरील घटनेवर आमचे लक्ष असल्याचे दोन्हीकडील व्यापाऱ्यांनी सांगितले.

जगातील कापसाच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकाचा देश असून मागणीत पाकिस्तान जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून पाकिस्तानातून मागणी घटली असल्याचे भारतीय निर्यातदारांनी सांगितले. सध्या दोन्ही देशात कापसाचा व्यापार होत नसल्याचे पाकिस्तान कॉटन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष एहसानुल हक यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये अनिश्चिततेची स्थिती असून राजकीय तणाव कमी झाल्यानंतर पुन्हा व्यापार सुरू होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानचे कापूस आयुक्त खालिद अब्दुल्ला यांनी सांगितले की, “सध्या कमी प्रमाणात व्यवहार होत आहे. पाक सरकारच्या वतीने भारतातून कापूस खरेदी बंद करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. तणाव शांत झाल्यानंतर सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा आहे.’

भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, व्यापार थांबल्याची त्यांना काहीच माहिती नाही. उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला दिलेला “मोस्ट फेवर्ड नेशन’ (एमएफएन) च्या दर्जाची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. यावर २९ सप्टेंबरला बोलावण्यात आलेली बैठक पुढे ढकलण्यात आली होती. सध्यातरी यावर पुढे कोणतीच चर्चा झालेली नाही.

निर्यातीवर होईल परिणाम : भारतीय निर्यातदार जयदीप फायबर्सचे सीईओ चिराग पटेल यांनी सांगितले की, भारतातील पीक वर्ष २०१६-१७ मध्ये एकूण ५० लाख गाठी कापसाची निर्यात केली. मात्र, पाकिस्तानमधून निर्यात झाली नाही तर ती कमी होऊन ३० लाख गाठींपर्यंत येऊ शकते. जळगावमधील व्यापारी प्रदीप जैन यांनी सांगितले की, कापूस निर्यातदार पाकिस्तानात कापूस विक्री करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे ते इतर बाजाराचा शोध घेत आहेत. मुंबईच्या एका निर्यातदाराने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाकिस्तानला ३० लाख गाठी कापूस आयात करण्याची गरज असेल तर भारताकडे अतिरिक्त ८० लाख गाठी कापूस असेल.
भारतीय कापसाचा सर्वात मोठा खरेदीदार देश पाक
वर्ष २०१५-१६ मध्ये भारताच्या ६४१ अब्ज डॉलरच्या एकूण निर्यातीमध्ये पाकिस्तानसोबत फक्त २.६७ अब्ज डॉलरचा व्यवसाय झाला. यामध्ये कापसाची भागीदारी सर्वात जास्त आहे. ३० सप्टेंबरला संपलेल्या पीक वर्षात पाक भारतीय कापसाचा सर्वात मोठा खरेदीदार राहिला आहे. यादरम्यान पाकिस्तानने २५ लाख गाठी कापूस आयात केला.

गुजरातच्या व्यापाऱ्यांनी भाज्यांची निर्यात बंद केली
सीमेवर दबाव पाहता गुजरातमधील व्यापाऱ्यांनी पाकिस्तानमधील भाज्यांची निर्यात बंद केली आहे. विशेषकरून टोमॅटो आणि मिरचीची निर्यात बंद झाली आहे. गुजरातमधून दररोज १० टन भाज्यांसह ५० ट्रक पाकिस्तानात जातात. मात्र, आता निर्यात बंद झाल्यामुळे गुजरातमधील शेतकरी आणि भाजी व्यापाऱ्यांना दररोज सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती अहमदाबाद जनरल कमिशन एजंट असोसिएशनचे सचिव अहमद पटेल यांनी शनिवारी दिली. दोन दिवसांपासून आम्ही वाघा बाॅर्डरच्या मार्गाने होणारी भाज्यांची निर्यात बंद केली असल्याचे त्यांनी सांगितले. १९९७ नंतर पहिल्यांदाच गुजरातमधील व्यापाऱ्यांनी पाकिस्तानात भाज्यांची निर्यात बंद केली आहे. शेतकरी - व्यापारी यांच्यात असोसिएशनची महत्त्वाची भूमिका असते.
बातम्या आणखी आहेत...