आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायदेशी पैसे पाठवण्यात भारतीय अव्वल स्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - विदेशात राहणारे भारतीय मायदेशी पैसे पाठवणाऱ्यांत अव्वल क्रमांकावर आहेत. या भारतीयांनी वर्ष २०१४ मध्ये ७० अब्ज डॉलर (सुमारे ४.३७ लाख कोटी रुपये) मायदेशी पाठवले आहेत. जागतिक बँकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट ब्रीफ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार वर्ष २०१४ मध्ये जगभरातील अनिवासींद्वारे मायदेशी पाठवण्यात येणारी रक्कम ५८३ अब्ज डॉलरपर्यंत (सुमारे ३६.४४ लाख कोटी रुपये) पोहोचली आहे.

या बाबतीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या अनिवासी नागरिकांनी ६४ अब्ज डॉलर (सुमारे चार लाख कोटी रुपये) स्वदेशी पाठवले. फिलिपाइन्स २८ अब्ज डॉलरसह (१.७५ लाख कोटी रुपये) तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर मेक्सिको आणि नायजेरिया यांचा क्रमांक आहे. वर्ष २०१४ मध्ये अनिवासी नागरिकांकडून भारतात पाठवण्यात आलेल्या रकमेचे प्रमाण ०.६ टक्क्यांनी वाढले आहे. वर्ष २०१३ मध्ये यात१.७ टक्के वाढ झाली होती. या बाबतीत शेजारी देशांची कामगिरी जास्त चांगली राहिली. पाकिस्तानात ही वाढ १६.६ टक्के, श्रीलंकेत ९.६ टक्के आणि बांगला देशात ८ टक्के राहिली. जागतिक बँकेच्या मते, २०१५ मध्ये मायदेशी पैसे पाठवण्याचे प्रमाण कमी होईल. जागतिक पातळीवर यात ०.४ टक्के वाढ होऊन ही रक्कम ५८६ अब्ज डॉलर राहील. विकसनशील देशांत पाठवण्यात येणाऱ्या रकमेत ०.९ टक्के वाढीसह ४४० अब्ज डॉलरची पातळी गाठण्याची शक्यता आहे.