आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industrial Production Got Boost Boost After Demand Increased

मागणी वाढल्याने औद्योगिक उत्पादन वाढीला चालना!, तिमाहीत ऑर्डर वाढल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशातील औद्योगिक उत्पादनात मार्चमध्ये चांगली वाढ झाली. मागणी वाढल्याचे हे संकेत आहेत. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने फेब्रुवारीत ५ टक्के वाढीसह नऊ महिन्यांचा उच्चांक गाठला. औरंगाबाद व जालना येथील औद्योगिक परिसरात असेच चित्र आहे. औरंगाबादेतील भांडवली वस्तू, वाहन, स्टील आणि ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू निर्मितीच्या क्षेत्रात मागणी व पुरवठा वाढीचे संकेत आहेत. मराठवाड्याच्या औद्योगिक क्षेत्रात ऑर्डरचे प्रमाण वाढल्याने गेले काही महिने या क्षेत्रात असलेली मरगळ दूर होण्याची चिन्हे आहेत. यातून औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्राला चांगले दिवस आल्याचे संकेत मिळत आहेत.

या संदर्भात औरंगाबाद येथील उद्योजक, निर्यातदार व सीएमआयचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले, देशातील मॅन्युफॅक्चरिंगचे चक्र आता वेगाने फिरत आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने फेब्रुवारी २०१५ मधील औद्योगिक वाढीसंबंधीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. त्यानुसार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ५.२ टक्के वाढ झाली आहें. याचाच अर्थ कंपन्यांमधून उत्पादन वाढत आहेत. मागणीचे प्रमाण वाढल्याने उत्पादन वाढत आहे. याचेच प्रतिबिंब काही अंशाने औरंगाबाद, जालना येथील कंपन्यांतून दिसून येत आहे. भांडवली वस्तू, वाहने, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि स्टील या प्रमुख क्षेत्रांत आता ऑर्डरचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले आहे. मागणी आल्याने उत्पादन वाढ होणार आहे.

जालन्यातील स्टील उत्पादनाला गती
मराठवाड्यातील चित्र : मराठवाड्यात वाहन, स्टील, भांडवली वस्तू व ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या क्षेत्रातील सध्याचे चित्र मागणी वाढल्याचे संकेत देत आहे.

फ्रिज, एसीला मोठी मागणी
ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंत (कंझ्युमर ड्युरेबल्स) रेफ्रिजरेटर, वातानुकूलित यंत्र (एसी),ओव्हन, टीव्ही, वॉशिंग मशीन आदी वस्तू येतात. या क्षेत्रातील ऑर्डरचे प्रमाण सध्या वाढले आहे. उन्हाळी हंगामामुळे फ्रिज, एसी निर्मितीत वाढ झाली आहे. वर्ल्ड कपमुळे टीव्हीची मागणी वाढली असून आयपीएलमुळे ती टिकून राहणार असल्याने या क्षेत्रात सध्या चांगले
वातावरण आहे.

ऑटो क्षेत्राला दिलासा
अनेक महिने घसरणीच्या घाटात अडकलेली वाहन विक्रीची, विशेषत: कार विक्रीची गाडी आता वाढीच्या वळणावर आहे. कंपन्या किफायतशीर किमतीतील मोटारसायकल देत असल्याने त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे औरंगाबादेतील बहुतेक कंपन्यांच्या ऑर्डर वाढल्या आहेत.

भांडवली वस्तू उत्पादन वेगात
यात प्रामुख्याने उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा समावेश असतो.जानेवारी ते मार्च हा काळ आर्थिक वर्षाच्या अखेरीचा आहे. त्यामुळे वर्षभरातील प्रलंबित ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी उत्पादन वाढते, शिवाय नव्या ऑर्डरचेही प्रमाण जास्त असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.

बँकांचाही हातभार
वाहन खरेदीसाठी बँका सुलभ कर्ज उपलब्ध करून देत आहेत. इतर क्षेत्रातही सुलभ वित्तपुरवठा होत असल्याने बँकांचाही हातभार औद्योगिक उत्पादनवाढीस लागत आहे.

स्टील तेजीत
पोलादाच्या क्षेत्रात सध्या संमिश्र वातावरण आहे. सरकारचे विविध प्रकल्प आणि वर्षअखेरच्या कामांची पूर्तता यामुळे स्टीलची मागणी वाढली आहे. त्याचा फायदा जालना येथील पोलाद कारखान्यांना होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
इंधन दरकपातीचा लाभ
इंधन दरकपात, डॉलर-रुपयाचे समीकरण, हंगामी मागणी आणि वर्षअखेरच्या टार्गेटची पूर्तता लक्षात घेता औद्योगिक उत्पादनात वाढीचा कल आहे एवढे निश्चित, असे उद्योजक मुकुंद कुलकर्णी म्हणाले.