आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्थेला झटका : महागाई दर 21 महिन्यांच्या उच्चांकावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महागाई बाबतमोदी सरकारला मोठा झटका बसला असून सोमवारी जाहीर झालेल्या या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर वाढून ५.७६ टक्क्यांवर पोहोचला आहे. डाळी आणि भाज्यांसह जवळपास सर्वच खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये तेजीने वाढ झाल्यामुळे महागाई दरात वाढ झाली आहे. गेल्या २१ महिन्यांत पहिल्यांदाच महागाई दर उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. याआधी आॅगस्ट २०१४ मध्ये किरकोळ महागाई दर ७.०३ टक्क्यांवर पोहोचला होता. एप्रिल २०१६ मध्ये तो ५.४७ टक्क्यांवर तर गेल्या वर्षी मे महिन्यात ५.१ टक्क्यांवर होता. गेल्या महिन्यात खाद्यपदार्थांची महागाई ७.५५ टक्क्यांवर आली होती, जी मे महिन्यात ६.३२ टक्क्यांवर होती.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने (सीएसओ) जाहीर करण्यात आलेल्या या आकडेवारीनुसार मे २०१६ च्या तुलनेत गेल्या महिन्यात डाळी ३१.५७ टक्क्यांनी महागल्या आहेत. साखर तसेच त्यापासून तयार होणाऱ्या इतर वस्तूंचे दर १३.९६ टक्के तर भाज्यांचे दर १०.७७ टक्क्यांनी वाढले आहेत. मसाल्याचे पदार्थ ९.७२ टक्क्यांनी महागले आहेत. शिक्षण ५.८५ टक्के आणि आरोग्य सेवा ५.१० टक्क्यांनी महागल्या आहेत.

ग्रामीण महागाईत वाढ
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील महागाई दरात जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. ग्रामीण भागात किरकोळ महागाई दर ६.४५ टक्क्यांवर आला असून खाद्यान्न महागाई ७.७५ टक्के नोंदवण्यात आली आहे. तर त्या तुलनेत शहरी भागातील महागाई दर कमी आहे. शहरी भागातील महागाई दर अनुक्रमे ४.८९ टक्के तसेच ७.२४ टक्के नोंदवण्यात आला आहे.

स्वस्त कर्जाची अपेक्षा कमी
भारतीयरिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या शंकेला सीएसओची आकडेवारी पूरक ठरली आहे. रिझर्व्ह बँकेने सात जूनला चलन धोरणाचा आढावा घेताना महागाई दरात अनिश्चितता दिसत असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे व्याजदरात कपात करण्याअाधी महागाई दर तसेच मान्सूनची प्रगती यावर लक्ष ठेवत असल्याचे सांगितले होते. जून महिन्यात महागाई कमी झाली तर आॅगस्ट महिन्यात व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली होती.