आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीपाल्याच्या किमतींमुळे घाऊक महागाई दरात वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नुकत्याच जाहीर झालेल्या किरकोळ महागाई दरानंतर मे महिन्यामध्ये घाऊक महागाई दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. मे महिन्यात घाऊक महागाई दर वाढून ०.७९ टक्क्यावर गेला आहे. यामुळे मोदी सरकारच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने व्याजदर कपातीच्या अपेक्षेलाही झटका बसला आहे.
महागाई दरात सतत वाढ होताना दिसत आहे. मे महिन्यात घाऊक महागाई दर वाढून ०.७९ टक्क्यांवर गेला असून, तो एप्रिल महिन्यात ०.३४ टक्क्यांवर होता. या उलट मार्च महिन्यात घाऊक महागाई दर ०.४५ टक्क्यांनी कमी झाला होता. अनेक दिवसांनंतर गेल्या दोन महिन्यांत घाऊक महागाई दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
गेल्या वर्षीची तुलना केल्यास गेल्या वर्षी मे महिन्यातच घाऊक महागाई दर शून्य ते २.२० टक्के खाली होता. म्हणजेच वस्तूंचे दर वाढण्याऐवजी सरासरी २.२० टक्क्यांनी कमी झाले होते. मात्र, सध्या सरकारच्या वतीने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तू आणि भाज्यांचे दर वर्षभरापूर्वीच्या तुलनेत अनुक्रमे ७.८८ आणि १२.९४ टक्के वाढले आहेत. एप्रिल महिन्यात हा दर अनुक्रमे ४.२३ टक्के आणि २.२१ टक्के होता. सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आकडेवारी पाहता सर्वात जास्त महागाई भाज्यांच्या किमतीमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
मे महिन्यात डाळींसह कडधान्यातील महागाई दर ३५.५६ टक्के नोंदवण्यात आला आहे. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात घाऊक बाजारात कडधान्यांचे दर इतके वाढलेले नव्हते. गेल्या महिन्यात अंडे, मांस आणि माशांचा महागाई दर ९.७५ टक्के नोंदवण्यात आला, तर फळांचे घाऊक बाजारातील दर ३.८० टक्क्यांनी वाढले.
मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर आल्यामुळे महागाई दरात वाढ झाली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कांद्याच्या दरात घसरण
एकीकडे सर्वच भाज्या, फळे आणि इतर खाद्यपदार्थांच्या महागाई दरात वाढ होत असताना, दुसरीकडे कांद्याच्या किमतीत सुरू असलेली घसरण कायम असल्याचे दिसून आले अाहे. वर्षभरापूर्वीची तुलना केल्यास कांद्याच्या दरात २१.७० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी कांद्याचे दर वाढल्यामुळे सरकारला कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करावी लागली होती. मात्र, यंदा उत्पादन वाढल्यामुळे कांद्याचे दर घसरले आहे.

टोमॅटोच्या दरात पंधरा दिवसांत दुप्पट वाढ
नवी दिल्ली- देशातील जवळपास सर्वच बाजारांत टोमॅटोचे दर ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. यंदा टोमॅटोच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे गेल्या १५ दिवसांतच टोमॅटोचे दर दुपटीने वाढले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच टोमॅटो २० ते ४० रुपये प्रतिकिलोने विक्री झाले. मोठ्या शहरात टोमॅटोचे सर्वात जास्त दर चेन्नईमध्ये नोंदवण्यात आले. चेन्नई मंडईमध्ये टोमॅटो ८० रुपये प्रतिकिलोच्या दराने विक्री होत आहेत. एक जून रोजी चेन्नईत टोमॅटो ४४ रुपये प्रतिकलोच्या दराने विक्री झाले होते. मुंबईमध्ये ३८ रुपये प्रतिकिलोवरून ५८ रुपये किलोवर दर पोहोचले आहेत, तर दिल्लीमध्येदेखील २५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारे टोमॅटो पंधरा दिवसांतच ५१ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.