नवी दिल्ली - अल्पबचतीच्या माध्यमातून पै- पैसा जमा करणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गाला शुक्रवारी केंद्र सरकारने झटका दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि किसान विकास पत्रावर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे. पीपीएफवर आजवर ८.७ टक्के दराने वार्षिक व्याज मिळत होते. त्यात कपात करून तो ८.१ टक्के करण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर सरकारने किसान विकासपत्राच्या व्याजदरातही कपात केली आहे. किसान विकासपत्रावर आजपर्यंत ८.७ टक्के व्याज देण्यात येत होते. आता हे व्याज ७.८ टक्के करण्यात आले आहे. याशिवाय सरकारने पाच वर्षे मुदतीसाठी गुंतवणूक केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या व्याजदरातही कपात करून तो ८.१ टक्क्यांवर आणला आहे. आधी तो ८. ५ टक्के होता. पोस्टाच्या बचतीचा ४ टक्के व्याजदर मात्र कायम ठेवण्यात आला आहे. ५ वर्षे मुदतीच्या मासिक प्राप्ती खात्यावर ८.४ टक्क्यांऐवजी आता ७.८ टक्केच व्याजदर मिळेल. मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदरही ९.२ टक्क्यांवरून ८. ६ टक्क्यावर आणण्यात आला. ५ वर्षे मुदतीच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ९.३ टक्क्यांवरून ८.६ टक्क्यांवर आणला आहे.
१६ फेब्रुवारी रोजी सरकारने अल्पबचत व्याजदर बाजारातील व्याजदराशी मिळतेजुळते करण्याचा निर्णय घेतला होता. त्या दिवशी अल्पमुदतीच्या पोस्टातील ठेवींच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात करण्यात आली होती.
असे घटले व्याजदर
योजना आधी आता
पीपीएफ ८.७ ८.१
किविप ८.७ ७.८
एनएससी ८.५ ८.१
ज्येष्ठ ना. ९.३ ८.६
सुकन्या ९.२ ८.६