आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचे किरकोळ धोरण बड्या व्यापाऱ्यांच्या हिताचे, मोहन गुरनानी यांची मुलाखत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिटेल उद्योगाला राज्यात चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने किरकोळ व्यापार धोरण तयार केले आहे. या धोरणाला मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. परंतु हे धोरण केवळ बड्या व्यापाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले असून त्यामध्ये लहान व्यापारी भरडले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या नवीन धोरणासंदर्भात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेचे माजी अध्यक्ष मोहन गुरनानी यांच्याशी केलेली बातचीत

प्रश्न : राज्याच्या किरकोळ व्यापार धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटते.?
उत्तर: दुकानाच्या कामकाजाची वाढवून दिलेली वेळ ही गोष्‍ट स्वागतार्ह आहे. पण किरकोळ धोरण मसुद्यात एफएसआय वाढवून देण्याचा झालेला विचार हा बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांना खूश करणार आहे. लहान व्यापाऱ्यांचा यात विचार झालेला नसल्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो.
प्रश्न : बाजार समितीमध्ये न जाताही शेतकऱ्यांना भाज्या व फळांची विक्री करता येणार आहे?
उत्तर : पूर्वी किरकोळ माल घेऊन ट्रक मुंबईत मस्जिद बंदर येथे यायचे आणि तेथून तो उपनगरात पाठवला जायचा. यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एपीएमसीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना मुंबई बाहेर पाठवले. पण आता या धोरणाच्या माध्यमातून पुन्हा बाजारात प्रवेश करण्याची परवानगी देताय हा एक प्रकारे अन्याय आहे. साठ वर्षांपूर्वी एपीएमसी कायदा आला त्यावेळी व्यापाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण होते. पण आता तो भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. मंत्री होऊ न शकलेल्यांचे पुनर्वसन आता एपीएमसीच्या माध्यमातून होते. त्यामुळे मुळात एपीएमसीच मोडीत काढले तर शेतकरी आपोआपच या जोखडातून मुक्त होतील.

प्रश्न : रिटेल उद्योगासाठी भूखंड तसेच किरकोळ व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र झोन शक्य आहे काय?
उत्तर : हे कसे शक्य आहे. हे किरकोळ धोरण वाचायला, ऐकायला छान आहे. मुळात पुरेशा प्रमाणात जागाच उपलब्ध नसल्यामुळे हे धोरण प्रत्यक्षात उतरवणे कठीण आहे.
प्रश्न : महिलांना रात्री दहा वाजेपर्यंत काम करण्याची तसेच कर्मचाऱ्यांना पसंतीनुसार साप्ताहिक सुटी देण्याचा विचार आहे?
उत्तर : किरकोळ व्यापार क्षेत्रात अनेक कामगार तसेच महिला कामगार मोठ्या संख्येने कार्यरत आहे. त्यामुळे या कामगारांना अशा प्रकारच्या सवलती मिळणे स्वागतार्ह आहे.
प्रश्न : रिटेल क्षेत्रात युवकांना शिक्षण देण्याचा विचार आहे याबद्दल काय वाटते?
उत्तर : युवकांना शिक्षित करायला पाहिजे ही गोष्ट योग्य पण किरकोळ व्यापारी आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. या आधी तुम्हाला वाण्याकडे जावेच लागत होते. पण आता मॉलमुळे स्वरूप बदलले असून ग्राहकांची मागणी बघून लहान दुकानेही स्मार्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे बदलत्या परिस्थितीचा विचार करून या युवकांना शिक्षण देण्याची गरज आहे.
प्रश्न : खाद्य आणि किराणा यांचा जीवनावश्यक सेवा म्हणून समावेश केल्यास परिणाम काय?
उत्तर :शासनाचा उद्देश चांगला असला तरी इथेही भ्रष्टाचाराला वाव मिळणार, कारण एकीकडे आपण इन्स्पेक्टर राज संपवण्याचा विचार करतोय पण यामुळे गैरप्रकारांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

प्रश्न :भविष्यात रिटेल क्षेत्रात बदल घडेल काय?
उत्तर : रिटेल उद्योगात चांगला बदल होईल, पण सरकारचा उद्देश सफल होणार नाही. यात मोठ्या व्यापाऱ्यांना प्रोत्‍साहन मिळून लहान व्यापारी मरतील.
( मोहन गुरनानी हे फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्‍ट्रचे माजी अध्‍यक्ष आहेत.)