आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पात अधिकाऱ्यांना दुरुपयोग करता येणार नाही अशी तरतूद आवश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योग संघटना फिक्कीचे अध्यक्ष तसेच फार्मा कंपनी जाइड्स कॅडिलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पटेल यांनी कर सुधारणा आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अर्थसंकल्पात करदात्यांना वाचवण्याच्या उपाययोजना हव्या असून अधिकाऱ्यांना दुरुपयोग करता येणार नाही अशी तरतूद आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यंदा अर्थसंकल्पात कराचे दर कमी करून टप्पे (स्लॅब) वाढवण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे लोकांकडे खर्च करण्यासाठी जास्त पैसे राहतील. त्यांच्याशी ‘दिव्य मराठी’ नेटवर्कचे संतोष ठाकूर यांनी केलेल्या चर्चेचा सारांश...    

अर्थसंकल्पातून आपल्याला काय अपेक्षा आहेत?    
उत्तर-
सरकार सुधारणांना पुढे सुरूच ठेवेल, अशी अपेक्षा असून त्या दृष्टीने डिजिटल पेमेंटला सरकार आधीच प्रोत्साहन देत आहे. विकास आणि रोजगाराला अर्थसंकल्पात प्राथमिकता द्यायला हवी. तसेच इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करायला हवे. विक्री वाढवण्यासाठी उपाय, करात सुधारणा होणेदेखील आवश्यक आहेच. कर अधिकाऱ्यांनी मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करू नये यासाठी करदात्यांना वाचवण्यासाठी उपाय करायला हवेत. नावीन्यपूर्ण संस्कृतीला प्रोत्साहन द्यायला हवे. मोठे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार 
राज्यांना ‘स्टेट सपोर्ट अॅग्रीमेंट’ करण्यास सांगू शकते.  
 
अर्थसंकल्पात करासंदर्भात कोणता निर्णय घेतला जाऊ शकतो?    
उत्तर-
कर दरात कपात तसेच कराचे टप्पे (स्लॅब) वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांकडे खर्च करण्यासाठी जास्त पैसे राहतील. कॉर्पोरेट करात कपात केल्याने कंपन्यांना गुंतवणुकीसाठी पैसे  मिळतील.    

जीएसटीकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत?    
उत्तर-
फिक्कीच्या ८९ व्या एजीएममध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १० मोठ्या मुद्द्यांवर सर्वसंमतीने निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. एक-दोन मुद्द्यांवर अद्याप सहमती बाकी असली तरी लवकरच एकमत होईल. जीएसटी लागू करण्यासाठी १६ सप्टेंबर २०१७ पर्यंत वेळ आहे. मात्र, जीएसटी जितक्या लवकर लागू होईल, तितके चांगले असल्याचे फिक्कीचे मत आहे.  
नोटाबंदीकडे तुम्ही कसे पाहता? अर्थसंकल्पावर याचा किती परिणाम झाला आहे?   
उत्तर-
काळा पैसा तसेच खोट्या नोटांच्या विरोधातला हा गंभीर निर्णय होता. अलीकडच्या काळात आणि नंतरही याचे सकारात्मक परिणाम होतील. सध्या आर्थिक घडामोडीत मंदी आली आहे. पूर्णपणे नगदीवर अवलंबून असलेल्या असंघटित क्षेत्रावर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. किरकोळ विक्री, पर्यटन आणि ज्वेलरी उद्योगावर सर्वाधिक विपरीत परिणाम झाला आहे. ऑटोमोबाइल तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रातही घसरण झाली आहे. नवीन नाेटा दाखल झाल्यानंतर रिकव्हरी वाढत जाईल. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था खूपच लवचिक असून लोक डिजिटल पद्धतीचा अवलंब करत अाहेत.   
 
या बदलाकडे उद्योग क्षेत्र कसे पाहते?   
उत्तर
- यात दोन मुद्दे आहेत, पहिले आर्थिक घडामोडीत आलेली मंदी आणि दुसरे डिजिटल पेमेंटकडे वाढलेला कल. कमी नगदी वापरण्याचे अर्थव्यवस्थेला अनेक फायदे आहेत. त्यामुळे डिजिटल होणे वाणिज्य तसेच उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...