आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयफोन X’च्या कमी पुरवठ्याने ग्राहक निराश; 55 देशांत विक्रीला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क/लंडन/सिडनी/नवी दिल्ली- जगातील दिग्गज तंत्रज्ञान कंपनी अॅपलने भारतासह ५५ देशांत शुक्रवारपासून त्यांच्या नव्या स्मार्टफोन ‘आयफोन X’ची विक्री सुरू केली आहे. मात्र फोनची संख्या कमी असल्याने ग्राहक नाराज झाले आहेत. भारतातील काही व्यापाऱ्यांकडे एकही फोन पोहोचू शकला नाही.

गेल्या दोन वर्षांत लोकांमध्ये आयफोनच्या खरेदीच्या उत्साहात घट नोंदवण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी लोकांमध्ये नव्या आयफोनच्या खरेदीसाठी आधीपेक्षा जास्त उत्साह दिसून आला. हजारो लोक अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन घेण्यासाठी रांगेत उभे राहिल्याचे दिसून आले. लंडन, टोकियो आणि सिडनीसारख्या मोठ्या शहरात अॅपलच्या अनेक स्टोअरवर लांबच लांब रांगा दिसून आल्या.

भारतात ‘आयफोन X’ची ऑफलाइन विक्री अॅपलच्या स्टोअरवर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू झाली. याच्या ६४ जीबीच्या मॉडेलची किंमत ८९,००० रुपये आहे. तर २५६ जीबीच्या मॉडेलची किंमत १.०२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने २७ आॅक्टोबरपासूनच ‘आयफोन X’च्या विक्रीसाठी प्री-ऑर्डर बुकिंग सुरू केली होती. प्री-ऑर्डर बुकिंगचे फोन बुकिंग सुरू झाल्याच्या काही मिनिटातच विकले गेले. पुरेसे कॅमेरे उपलब्ध नसल्याने कंपनी मागणीनुसार ‘आयफोन X’ बनवू शकणार नसल्याची चर्चा होती. त्यामुळेच लोकांनी तत्काळ प्री-बुकिंग केली होती. तर अनेकांना ‘आयफोन X’ मिळवण्यासाठी पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. कंपनीने हा नावा स्मार्टफोन आयफोनला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बाजारात आणला आहे.

अॅपलच्या नफ्यात ५.८ टक्के वाढ 
अॅपलला ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ५.८ टक्के जास्त, ३.१४ लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. विक्री ६.३ टक्क्यांनी वाढून १४.९ लाख कोटी रुपयांची झाली. सप्टेंबर तिमाहीमध्ये विक्री १२ टक्क्यांनी वाढून ३.४२ लाख कोटी रुपये झाली आहे. नफा १९ टक्के जास्त ६९,६४० कोटी रुपये राहिला. कंपनीने जुलै ते सप्टेंबर तिमाहीदरम्यान जगभरात ४.६७ कोटी आयफोनची विक्री केली अाहे. आता या नव्या फोनमुळे विक्रीत वाढ होण्याची अॅपलला अपेक्षा आहे.  

भारतात कंपनीला जास्त संधी 
कंपनीचे सीईओ टिम कुक म्हणाले की, ‘भारतात कंपनीच्या व्यवसायासाठी मोठी संधी आहे. ज्या प्रमाणात मोठे स्टोअर सुरू होत आहेत, त्यानुसार चांगले उत्पादन दिल्यास ग्राहक ते हातोहात खरेदी करतील असे मला वाटते. असे असले तरी अजूनही आम्ही भारतातील बाजाराला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याला आम्ही समस्या नाही तर संधीच्या स्वरूपात पाहत आहोत.’
 
भारतातील विक्री दुपटीने वाढली  
जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या समान तिमाहीच्या तुलनेत भारतात अॅपलच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. यात आयफोन आणि आयपॅडच्या विक्रीचे सर्वाधिक योगदान राहिले. भारतात आमच्या वार्षिक विक्रीच्या आकडेवारीत दुपटीने वाढ झाली असल्याचे अॅपलचे सीएफओ लुका मेस्त्री यांनी म्हटले आहे. चीन क्षेत्रातील विक्रीही १२ टक्क्यांनी वाढली आहे. विकसनशील देशांमधील विक्रीत २० टक्क्यांची वाढ झाली आहे.  
बातम्या आणखी आहेत...