नवी दिल्ली - भारतातून जास्त प्रमाणात बासमती तांदूळ आयात करण्याचे आश्वासन इराणने दिले आहे. वाणिज्य सचिव राजीव खेर यांनी अलीकडेच केलेल्या तेहरान दौर्यात याबाबत चर्चा झाली. इराणने ऑक्टोबर २०१४ नंतर यासंदर्भातील नवा आयात परवाना जारी केलेला नाही. आयात वाढवण्यासाठी आता लवकरच नवीन परवाना जारी होण्याची शक्यता आहे.
भारतातून बासमती तांदळाची सर्वाधिक आयात इराणकडूनच होते. मात्र गेल्या वर्षी याबाबतचे नियम कडक करण्यात आल्याने इराणला होणारी निर्यात घटली होती. भारतातून होणारी बासमतीची एकूण निर्यातही कमी झाली होती. भारतीय बासमतीत काही रसायनांचे अंश जास्त प्रमाणात सापडल्याने इराणने नवा परवाना जारी केला नव्हता. मात्र, वाणिज्य सचिवाशी झालेल्या चर्चेत इराणने या नियमांबाबत काहीच सवलती दिलेल्या नाहीत.
इराणला हवा मुक्त व्यापार करार
भारताशी व्यापार वाढवण्यासाठी मुक्त व्यापार करार हवा, असे इराणला वाटते. वाणिज्य सचिवांनी सांगितले, पाश्चिमात्य देशाकडून निर्बंध हटवल्यानंतर जागतिक व्यापारात हिस्सेदारी वाढवण्यासाठी इराण उत्सुक आहे. त्यामुळे भारताबरोबर मुक्त व्यापार करार करण्यास इराणने उत्सुकता दाखवली आहे. नुकतेच दोन्ही देशांत झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीसाठी खेर तेहरानला गेले होते. वाणिज्य सचिवांनी सांगितले, हा करार भारतासाठी फायद्याचा राहील. इराणबरोबर आयात -निर्यात तर वाढेलच, शिवाय या देशाच्या माध्यमातून युरोपचा काही भाग आणि आफ्रिकेतील देशाशी निर्यात वाढू शकते.
प्रतिबंध हटल्यास फायदा
प्रतिबंध हटल्यास इराणकडून जास्त प्रमाणात कच्चे तेल आयात करता येईल. सोने, मौल्यवान रत्ने व दुर्मिळ खनिजे यांच्या व्यापारांत वाढ होईल. खेर यांनी सांगितले, पेट्रोकेमिकल, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, वाहन, औषध निर्माण आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणुकीस इराण उत्सुक आहे. रेल्वे, वीज आणि सिंचन सुविधा या क्षेत्रात इराणला भारताची मदत हवी आहे.