आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय ‘फीडर फंडा'त गुंतवणूक फायद्याची ठरेल?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंतवणुकीला घडवा जागतिक सफर
भारतीयांना दर साल सव्वा लाख अमेरिकी डॉलर निधी विदेशात गुंतविता येतो. पण ही रक्कम थेट विदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणे हे कायदेशीर व करविषयक मुद्द्यामुळे कटकटीचे ठरतेय.

विविधता अर्थात डायव्हर्सिफिकेशन हा कोणत्याही सुज्ञ गुंतवणुकीचा मूलमंत्रच म्हणायला हवा. आजच्या आधुनिक काळात गुंतवणुकीशी निगडित जोखमीचे प्रमाण पाहता, आपला सर्व पैसा एकाऐवजी अनेकांगी गुंतवणूक पर्यायांमध्ये विभागलेला असणे केव्हाही महत्त्वाचेच ठरेल. पण ही विविधता वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमधून जशी साधता येते, तशी ती वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांत करूनही साधली जाऊ शकते.

जागतिकीकरणाच्या आजच्या युगात आपल्या गुंतवणूक डावपेचांनाही जागतिक पैलू असायला हवा. भारताच्या गुंतवणूक विश्वाची कवाडे जागतिक भांडवली बाजारासाठी खुली होण्यापूर्वी, विविधता ही वेगवेगळ्या उपलब्ध पर्यायांमध्ये गुंतवणूकयोग्य निधीचे विभाजनापुरतीच मर्यादित होती, परंतु २००४ सालानंतर भारतीय गुंतवणूकदारांना विदेशात गुंतवणुकीची मुभा मिळाली आणि गुंतवणूक वैविध्याला नवा संदर्भ प्राप्त झाला.
दार धन प्रेषण योजना (लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम- एलआरएस) या अंतर्गत भारतीयांना दर साल सव्वा लाख अमेरिकी डॉलर इतका निधी विदेशात गुंतविता येतो. पण ही रक्कम थेट विदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणे हे कायदेशीर व करविषयक मुद्द्यामुळे बरेच कटकटीचे ठरेल. त्यामुळे म्युच्युअल फंड हा विदेशात गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरतो.

अ.- विदेशातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे तीन प्रकार
१. जागतिक बाजारपेठेत थेट गुंतवणूक करणारे फंड
२.फीडर फंड :प्रस्थापित ग्लोबल फंडांमध्ये या फंडातून गुंतवणूक केली जाते.
३. फंड ऑफ फंड्स धाटणीचा आहे. हा असा फंड आहे जो अनेक प्रकारच्या फंडात गुंतवणूक करीत असतो. याचा फायदा असा की, एकीकडे आपल्या पैशाला आंतरराष्ट्रीय पंख प्राप्त होतात, त्याच वेळी एकाच फंडातून अनेक प्रदेशात व अनेक फंडात गुंतवणूक विभागली गेल्याने जोखीमही कमी होते.

ब.- वैविध्यासाठी आंतरराष्ट्रीय फंडातच गुंतवणूक का?
हा एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न आहे. पण त्याला उत्तर देणारी सबळ कारणेही आहेत.
१.देशांतर्गत जोखमीपासून आंतरराष्ट्रीय फंड तुमच्या गुंतवणुकीचा बचाव करतील. २. अन्य उदयोन्मुख देशातील शेअर बाजारांच्या दमदार कामगिरी व परताव्याचा तुम्हाला लाभ मिळेल. ३. सध्याच्या संदर्भात तब्बल सहा वर्षांच्या मंदी व साचलेपणातून जागतिक अर्थकारणाने उभारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर भांडवली बाजाराच्या संभाव्य तेजीत सहभाग गुंतवणूकदारांसाठी लाभकारकच ठरेल.

भारतातील अनेक डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांच्याही गुंतवणूक उद्दिष्टात ३५ टक्क्यांपर्यंत निधी हा विदेशातील बाजारांमध्ये गुंतवणुकीचा असतो. या पर्यायाचाही गुंतवणूकदारांना विचार करता येईल. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणुकीतून त्यांना करमुक्त परताव्याचे लाभ मिळविता येतील. टेम्पल्टन इंडिया इक्विटी इन्कम फंडाचे या संदर्भात सर्वोत्तम उदाहरण ठरेल. या फंडाने गेल्या आठ वर्षांत वार्षिक १३.९ टक्के असा दमदार दराने परतावा दिला आहे.
(लेखक हे जिओजित बीएनपी परिबा या दलाली संस्थेचे गुंतवणूक विशेषज्ज्ञ अाहेत. )
बातम्या आणखी आहेत...