आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेफ बेजोंची संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या वर, आधीचा 18 वर्षे जुना विक्रम मोडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजो यांनी १८ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. त्यांची संपत्ती वाढून पहिल्यांदाच १०० अब्ज डॉलर (सुमारे ६.५ लाख कोटी रुपये) च्याही वर गेली आहे. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनचे ५३ वर्षीय बेजो संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. त्यांच्या संपत्तीत ही वाढ “ब्लॅक फ़्रायडे’ मुळे झाली आहे. मागील १८ वर्षांत एखाद्या अब्जाधीशांची संपत्ती १०० अब्ज डॉलरच्याही वर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आधी १९९९ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या संपत्तीचा आकडा या पातळीच्या वर गेला होता.  


या वर्षी जुलै महिन्यात बेजो पहिल्यांदाच बिल गेट्स यांना मागे टाकत काही क्षणासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. मात्र, त्यांनी ऑक्टोबर महिन्यात हे स्थान परत मिळवले होते. बिल गेट्स यांची सध्याची संपत्ती ८९.१ अब्ज डॉलर (सुमारे ५.७९ लाख कोटी रुपये) आहे. सध्या या संपत्तीसह ते जगातील टॉप - ५ श्रीमंतांत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ७८.७ अब्ज डॉलरच्या (सुमारे ५.११ लाख कोटी रुपये) संपत्तीसह वॉरेन बफे तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.  
जगातील अब्जाधीशांची संपत्ती मोजणाऱ्या ब्लूमबर्ग बिलियनेअर्स निर्देशांकांच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार बेजो यांच्याकडे सध्या बिल गेट्स पेक्षा १०.९० अब्ज डॉलरची (सुमारे ७०,८५ कोटी रुपये) जास्त संपत्ती आहे. तर वॉरेन बफे यांच्यापेक्षा २१.३ अब्ज डॉलर (सुमारे १.३८ लाख कोटी रुपये) जास्त संपत्ती आहे.

 

एका महिन्यात यात २२ % तर वर्षभरात ५२% वाढ
 बेजो यांच्याकडे अमेझॉनचे ७.८९ कोटी शेअर आहेत. शुक्रवारी अमेझॉनचे शेअर २.५८ % वाढीसह १,१८६ डॉलर (सुमारे ७७,०९० रुपये) या दरावर बंद झाले. त्या बदल्यात केवळ एक दिवसात बेजो यांच्या संपत्तीचे मूल्य २.३५ अब्ज डॉलर (सुमारे १५,२७५ कोटी रुपये) ची वाढ झाली. गेल्या आठवड्यात अमेझॉनच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली होती. एका महिन्यात यात २२ टक्के तर वर्षभरात ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात बेजो यांच्या संपत्तीत ३४.९० अब्ज डॉलर (सुमारे २.२६ लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांची संपत्ती ६५.१ अब्ज डॉलर (सुमारे ४.२३ लाख कोटी रुपये) होती. 

 

अॅमेझॉन डॉट कॉम वर दृष्टिक्षेप   
बेजो यांनी अॅमेझॉन डॉट कॉमची स्थापना पाच जुलै १९९४ रोजी सिएटल, वॉशिंग्टनमध्ये केली होती. अमेरिकी शेअर बाजार नास्डेकमध्ये त्यांच्या कंपनीचा मार्केट कॅप सध्या ५७,१६९ कोटी डॉलर (सुमारे ३७.१५ लाख कोटी रुपये) आहे. अॅमेझॉन डॉट कॉम महसुलाच्या दृष्टीने जगातील तिसरी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे, तर अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने खासगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. यात ५ लाख ४१ हजार ९०० कर्मचारी काम करतात.  

 

बेजो यांनीही १५ वर्षांत ३,२५० कोटी केले दान  
दुसरीकडे जॅफ बेजो यांनी परोपकाराच्या कामांसाठी आता जास्त दान देण्यास सुरुवात केली आहे. याच वर्षी जून महिन्यात त्यांनी ट्विट करून कोणत्या पद्धतीने मदत करता येईल, असे लोकांनाच विचारले होते. अॅमेझॉनच्या सध्याच्या शेअरचा भाव पाहिला तर बेजो यांनी २००२ पासून आतापर्यंत ५० कोटी डॉलर (सुमारे ३,२५० कोटी रुपये) चे शेअर दान केले आहेत.   

 

 

... तर ९.७५ लाख कोटींची असेल गेट्स यांची संपत्ती 
बिल गेट्स परोपकाराच्या कामांवर २१ वर्षांपासून त्यांच्याकडील संपत्ती दान करत आहेत. जर त्यांनी असे केले नसते तर आतापर्यंत त्यांची संपत्ती १५० अब्ज डॉलर (सुमारे ९.७५ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त असली असती. १९९६ पासून ते आतापर्यंत गेट्स यांनी त्यांची कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे जवळपास ७० कोटींचे शेअर आणि २.९० अब्ज डॉलर (सुमारे १८,८५० कोटी रुपये) नगदीमध्ये, तर इतर संपत्ती दान केलेली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...