आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य आत्मसात करा, नोकऱ्या आपोआप मिळतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे, “कुठे आहेत नोकऱ्या?’  या प्रश्नाचे उत्तर केवळ सत्तेतील लोकच देऊ शकतात, असे बहुतेक जणांना वाटते. हाच प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही विचारला जाणे अगदी स्वाभाविक आहे. वास्तविक पाहता सरकारलाही नोकऱ्या निर्माण करताना मर्यादा आहेत.
 
कारण सरकार पातळीवर सुरक्षा, पोलिस, प्रशासकीय अशा निवडक क्षेत्रांतच नोकऱ्या निर्माण केल्या जाऊ शकतात. तरीसुद्धा सरकारकडे या समस्येचे ठोस समाधान नाही. उद्योग आणि आर्थिक विकासानेच देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. पण नोकऱ्या नेमक्या कुठे निर्माण होत आहेत आणि कोणाला मिळत आहेत यावर सरकार निश्चितच लक्ष ठेवू शकते. दुसरी बाब म्हणजे तरुणांनी कौशल्य शिक्षण घेऊन रोजगार मिळवावे यासाठी तशी वातावरणनिर्मिती करण्याचे काम सरकारला करता येईल.  

बहुतांश नोकऱ्या अशा ठिकाणी निर्माण होत आहेत जेथे  खूप कमी लोकांचे लक्ष आहे. अशी काही ठरावीक क्षेत्रे आहेत. यावर आता नजर टाकू. उदा. जेव्हा तुम्ही घर किंवा कार्यालयातून इडली-डोसा किंवा पावभाजीची ऑर्डर देता तेव्हा कुणी तरी व्यक्ती त्याचे पार्सल आणून देते. याचाच अर्थ रेस्टॉरंटचे जेवण कार्यालय किंवा घरापर्यंत पोहोचवण्याची ऑफर तुम्हाला दिली जात आहे. म्हणजेच लॉजिस्टिक चेन आणि वेअर हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होत आहेत. जर तुम्ही एखाद्या हाउसिंग सोसायटी किंवा कार्यालयात प्रवेश करता तेव्हा तेथील सुरक्षारक्षक तुमचे नाव, पत्ता रजिस्टरमध्ये नोंदवतो, ओळखपत्र, मोबाइल नंबर विचारतो. 

वरकरणी यात काही वाटत नसले तरी सुरक्षा क्षेत्रातही असंख्य नोकऱ्यांची संधी निर्माण होत आहे. जेव्हा जेव्हा आपण उबेर टॅक्सी बुक करतो तेव्हा वास्तवात एका पूर्ण वेळ चालकाऐवजी अर्धवेळ चालकाला रोजगार देत असतो. टॅक्सी किंवा ऑटोसाठी राइड शेअरिंग अॅपचा वापर वाढल्यापासून चालकांनाही मोठ्या संख्येने रोजगार मिळत आहे. पूर्ण वेळ काम करणाऱ्या महिलांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. कुठल्याही सासूला सून घरात बसून राहावी, असे वाटत नाही. त्यामुळे शहरात जागोजागी पाळणाघर आणि प्ले- स्कूल निर्माण झालेले दिसत आहेत. 

येथे मुलांचा सांभाळ करण्यासाठी तरुणी, महिला आणि घरकाम करणाऱ्या ज्येष्ठ महिलांनाही पूर्ण वेळ रोजगार मिळाला आहे. पूर्वी वयस्कर महिला बालवाडी किंवा प्ले स्कूलमध्ये मोफत सेवा देत होत्या, पण आता याच सेवेचे पैसे मिळत आहेत. श्रीमंत लोक घरात मुलांचा सांभाळ करण्यासाठी पूर्ण वेळ मदतनीस ठेवत आहेत. एका वेळी एकत्रित कुटुंबात घरात बनवलेल्या जेवणाला महत्त्व दिले जात नव्हते, पण आता शहरात आता याच सेवेचे पैसे आकारले जात आहेत. याच पद्धतीने वॉशिंग मशीन आणि व्हॅक्युम क्लीनरमुळे घर किंवा कार्यालयात काही नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. परंतु घरांमध्ये काम करणाऱ्या स्वयंपाकी किंवा अर्बन क्लीनिंग सर्व्हिसेस प्रदान करणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या सहज मिळत आहेत.

समग्र दृष्टीने विचार करता जागतिकीकरण आणि ऑटोमेशनमुळे अनेक नोकऱ्या संपुष्टात येत आहेत. पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कामही मिळत आहे. तरीसुद्धा आपण “कुठे आहेत नोकऱ्या?’ या प्रश्नावर अटकलो आहोत. याचे कारण म्हणजे आपण या प्रश्नाकडे कधी योग्य दृष्टिकोनातून पाहिलेच नाही.    

नोकऱ्या कुठे आहेत याचे उत्तर शोधताना नोकऱ्या का मिळत नाहीत?  याचा विचार करणे आवश्यक आहे. नोकऱ्यांबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये कंपनी, कार्यालय, सरकारी कार्यालय किंवा बँकेचे चित्र नजरेसमोर येते. या नोकऱ्यांमध्ये आपणाला निश्चित वेतन आणि ठरावीक काळामध्ये त्यात वाढ होते एवढीच मर्यादित माहिती असते. 

परंतु तंत्रज्ञानावर आधारित अशा एका दुनियेत आपण प्रवेश करत आहोत जेथे नोकऱ्यांची संख्या घटत जाणार आहे. उत्पादन कंपन्या उत्पादन वाढवण्यासाठी रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) सध्या जास्त वापर करत आहेत. कंपन्यांमध्ये लोकांना अस्थायी तत्त्वावर किंवा कंत्राट पद्धतीवर नोकरीवर ठेवले जात आहे. यामुळे सुरक्षित नोकऱ्यांची संख्या घटत आहे. कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये श्रमिकांची कमी गरज असते. तर डीलर नेटवर्क आणि लहान गॅरेजमध्ये काम करणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात गरज असते. यात काही नोकऱ्या स्थायी स्वरूपाच्या नाहीत. 

इतकेच नव्हे, तर सॉफ्टवेअर सर्व्हिसेसमध्येही कमी कौशल्य असणाऱ्या कोडिंग (उदा. जावा प्रोग्रॅमिंग) सारख्या नोकऱ्या संपत आहेत. याची जागा आता ऑटोमेशेनने घेतली आहे. याच पद्धतीने एका मर्यादेनंतर सरकारला सैन्याची मोठ्या प्रमाणात गरज पडणार नाही. कारण युद्ध आता सायबर-स्पेस आणि ड्रोनच्या दिशेने जात आहे. एकूणच काय तर सध्या अल्प काळासाठी नोकऱ्यांची निर्मिती होत आहे. त्या नोकऱ्यांचा दर्जाही कमी आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने नवीन कौशल्य शिकत राहण्याची खरी गरज आहे. कारण एक नोकरी गेली तर दुसरी सहज मिळू शकेल. वास्तवात सरकार नवीन नोकऱ्या निर्माण नाही करू शकत, परंतु नवीन ट्रेंड दाखवून लोकांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे मात्र सरकार उघडू शकते. यासाठी “नोकऱ्या कुठे आहेत?’ याऐवजी “कौशल्य वाढवून नवीन नोकरी कशी शोधावी?’ हा प्रश्न विचारावा लागेल.   
 
लेखक आर्थिक प्रकरणाशी संबंधित ज्येष्ठ पत्रकार,‘डीएनए’ चे संपादक होते.
rjagannathan@dbcorp.in
 
बातम्या आणखी आहेत...