आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसर्च अँड डेव्हलपमेंट व्यावसायिकांसाठी तीन वर्षांत एका लाखापेक्षा जास्त नोकऱ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक क्षेत्राच्या विस्तारात विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. या सर्व तंत्रज्ञानामागे रिसर्च आणि डेव्हलपमेंटची (संशोधन आणि विकास) भूमिका महत्त्वाची असते. मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्येही संशोधनावर भर दिला जात आहे. एका अहवालानुसार, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये  २०२० च्या अखेरपर्यंत १ लाख २० हजार नव्या व्यावसायिकांची गरज असेल.   

विविध क्षेत्राच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये या क्षेत्रावर भारतात सुमारे ६२ अब्ज डॉलर खर्च करण्यात आला. २०१६ च्या अखेरपर्यंत तो ७१.५० अब्ज डॉलरवर पोहोचला. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या देशभरात ३८ प्रयोगशाळा आहेत. सरकारकडूनही याबाबतीत अनेक प्रयत्न सुरू आहेत. संशोधनातील स्टार्टअपच्या मदतीसाठी पुढील चार वर्षांत ३० अब्ज डॉलर खर्चून १०० इन्क्युबेटर स्थापित केले जातील. शिवाय, संशोधनास चालना देण्यासाठी आयआयटीमधून चांगल्या गुणांनी बी. टेक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट पीएचडीसाठी प्रवेश दिला जात आहे.  

युवतींच्या प्राेत्साहनासाठी योजना
युवतींना रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी प्रोत्साहित करण्यासाठी  २९७.५० अब्ज डॉलरचा पथदर्शी उपक्रम राबवण्यात आला आहे. यात विज्ञान क्षेत्राची आवड असणाऱ्या एक लाख मुलींचा समावेश असेल. रिसर्च अँड डेव्हलपमेंट व्यावसायिकांना विशिष्ट क्षेत्रात संशोधन करावे लागते. प्रत्येक क्षेत्रातील काम वेगवेगळे असू शकते.  उदाहरणार्थ औषध निर्माण क्षेत्रातील संशोधकांना एखाद्या आजारावर औषध शोधावी लागते तर सॉफ्टवेअर आणि इंटरनेट क्षेत्रात सर्चिंग तंत्रज्ञान उत्तम बनवण्यावर भर दिला जातो. रिसर्च अँड डेव्हलपमेंट बाजारात सॉफ्टवेअर आणि इंटरनेटचाच सर्वाधिक वाटा असतो.   
 
सॉफ्टवेअर आणि इंटरनेट  
आयटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा त्यासंबंधी पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर संशोधनास प्रवेश घेता येईल. सध्या सर्च इंजिन तंत्रज्ञान प्रभावी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत अनेक संशोधने होत आहेत. संशोधन प्रवेशासाठी गेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण असावी लागते.  

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स  
इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या बाजाराच्या दृष्टिकोनातून यात अनेक संशोधनविषयक उपक्रम राबवले जात आहेत. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्समधून बीई, बीटेक किंवा बीएस्सी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. पदव्युत्तर पदवीनंतर पीएचडी अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. 

टेलिकॉम अाणि तंत्रज्ञान
फोरजी तंत्रज्ञान आल्यानंतर आता फाइव्ह जी आणि नेटवर्किंग उत्तम बनवण्यासाठी संशोधन सुरू आहे. यात विद्यार्थ्यांना मोबाइल तंत्रज्ञान समजून घ्यावे लागते. यासंबंधित अभ्यासक्रम देशभरातील विविध संस्थांमध्ये असतात. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधून अभियांत्रिकी करणाऱ्यांना यात करिअरच्या संधी आहेत.  

औषधनिर्माण  
जगभरात आजारांवरील उपचारांसाठी औषधी संशोधन सुरू आहे. जीवशास्त्राची पार्श्वभूमी असलेल्यांना यात संधी असते. औषध उद्योगात बनावट औषधी तपासणीपासून अणू-रेणूंवरीलही संशोधन होतात. यात रोजगाराच्या संधीही जास्त आहेत. संशोधनात काम करण्यासाठी किमान पदव्युत्तर पदवी आवश्यक अाहे.  

विशिष्ट क्षेत्रात संधी  
संबंधित विषयाचा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात नोकरीची संधी असते. औषध निर्माणाचा संशोधन अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औषधी कंपन्या किंवा सरकारी प्रयोगशाळेत नोकरी  आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी विविध तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्यांतही रोजगार मिळू शकतो. दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यांत विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना संधी मिळते.  
   
वेतनही अधिक  
या क्षेत्रात मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने वेतनही अधिक असते. सुरुवातीला २५ ते ३० हजार रुपये दरमहा पगार मिळू शकतो. क्षेत्र व संस्थेनुसार यात फरकही असू शकतो. काही वर्षांच्या अनुभवानंतर संशोधनविषयक व्यावसायिकास ८ ते १० लाखांचा वार्षिक पॅकेज मिळण्याची शक्यता असते.
बातम्या आणखी आहेत...