आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इथेनॉल, विजेने ऊस उत्पादकांना मिळाले साडेसोळा हजार कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अवर्षणामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऊस गाळप कमी होऊनही इथेनॉल आणि सहवीजनिर्मितीमुळे राज्यातल्या साखर धंद्याला दमदार उत्पन्न मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातल्या कारखान्यांनी २०१५-१६ च्या हंगामात तब्बल २६५ कोटी युनिट वीज उत्पादन घेतले तसेच ३७ कोटी लिटर इथेनॉल विक्रीच्या निविदा भरल्या.
इथेनॉल व सहवीजनिर्मितीतून मिळालेले अतिरिक्त उत्पन्न तसेच राज्य व केंद्र सरकारकडून उपलब्ध झालेल्या कर्जामुळे राज्यातल्या ऊस उत्पादकांना २०१५-१६ च्या हंगामात तब्बल १६ हजार ४७१ कोटी रुपये उसाच्या ‘एफआरपी’पोटी कारखान्यांना देता आले, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. उसाच्या देय किमतीपैकी ९९.२ टक्के पैसे साखर कारखान्यांनी अदा केले आहेत. जेमतेम १५७ कोटी रुपयांची गेल्या हंगामातील देणी थकीत आहेत. ही रक्कमसुद्धा यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातले ५१ सहकारी साखर कारखाने ९९७ मेगावॅट वीज तयार करतात. यंदा आणखी १२ कारखान्यांचे सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू होतील. सहवीजनिर्मिती करणाऱ्या खासगी कारखान्यांची संख्या ५२ आहे. एकूण राज्यातील १०३ कारखाने १८५० मेगावॅट विजेची निर्मिती करतात. यात आणखी ३५० मेगावॅटची भर पडणार आहे. सहकारी कारखान्यांना सहवीजनिर्मितीसाठी राज्य शासनाने पाच टक्क्यांप्रमाणे १४३ कोटी रुपयांचे भांडवल दिले आहे. या माध्यमातून २०१५-१६ च्या हंगामात राज्यातल्या सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी एकूण २६५ कोटी वीज तयार केली. यापैकी ५७ टक्के म्हणजे १५२ कोटी युनिट्स विजेची विक्री कारखान्यांनी केली. यातून साखर कारखान्यांना ९५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. उर्वरित ११३ कोटी युनिट््स वीज कारखान्यांनी स्वत:साठी वापरली. त्यामुळे कारखान्यांच्या ४८० कोटी रुपयांच्या वीज बिलाची बचत झाली, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.

राज्यातल्या ६९ सहकारी आणि ३२ खासगी साखर कारखान्यांकडे आसवणी प्रकल्प आहेत. राज्याची एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता १३६.७ कोटी लिटरची आहे. प्रत्यक्षात फक्त ५५ साखर कारखाने इथेनॉलचे उत्पादन घेतात. पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रणाची परवानगी आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि गोवा या सहा राज्यांमध्ये १० टक्के मिश्रणास अनुमती आहे. सन २०१५-१६ च्या हंगामात तेल कंपन्यांनी महाराष्ट्रातून ३९.८० कोटी लिटर इथेनॉलची मागणी केली होती. यासाठी ४२ रुपये ५ पैसे प्रति लिटर ही ‘बेस प्राइस’ निश्चित झाली. त्यानुसार कारखान्यांनी ३७ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याच्या निविदा भरल्या. आतापर्यंत २४ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा कारखान्यांनी केला आहे, असेे डाॅ. शर्मा यांनी सांगितले.

मराठवाड्यात मोठी घट
कोल्हापूर आणि पुणे विभागात राज्यातील सर्वाधिक ऊस व साखर उत्पादन होते. यंदा पुण्यातील उसाचे क्षेत्र २.११ लाख हेक्टर असून यातून १५९ लाख टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे. कोल्हापुरातील २ लाख हेक्टर ऊस क्षेत्रामधून १६५ लाख टन ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. औरंगाबाद विभागात गेल्यावर्षी १.०४ लाख हेक्टर असणारे ऊस क्षेत्र यंदा दुष्काळामुळे ६७ हजार हेक्टरपर्यंत घसरले आहे, तर नांदेड विभागातील उसाचे क्षेत्र १.२७ लाख हेक्टरवरून ५० हजार हेक्टरपर्यंत खाली आले आहे. औरंगाबाद आणि नांदेड विभागात यंदा अनुक्रमे ३४ लाख व २४ लाख टन उसाचे उत्पादन अपेक्षित असल्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तवला आहे.
बातम्या आणखी आहेत...