आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीनंतर असंघटित क्षेत्रात नोकऱ्यांवर गदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : नोटबंदीच्या निर्णयानंतर एफएमसीजी, ज्वेलरी आणि लघु उद्योग क्षेत्राला अधिक फटका बसला आहे. शिवाय असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. औद्योगिक संघटना असोचेमने यासंदर्भातील दावा केला.

संघटनेचे अध्यक्ष सुनील कनोडिया म्हणाले की, सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाहेर केल्या. याची पूर्वतयारी करण्यात आली नाही. या निर्णयाचा परिणाम कसा होईल आणि आव्हाने काय येतील, याचा विचार कदाचित सरकारने केलेला दिसत नाही. हा निर्णय घेण्याअगोदर बरेच काम करायला हवे होते. या निर्णयाची ज्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली ते पाहता पंतप्रधान नक्कीच यापासून समाधानी नसतील. नोटबंदीमुळे जीडीपीवर परिणाम होणार असल्याचे त्यांनी स्वत:च सांगून टाकले आहे.

कनोडिया यांच्या मते, नोटबंदीनंतर इच्छित परिणामांपर्यंत पोहाेचण्यासाठी मोठ्या सुधारणांची गरज आहे. विशेषत: काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्याच्या दृष्टीने अधिक काम होणे अपेक्षित आहे. या निर्णयाचा ज्वेलरी कंपन्यांवर सर्वाधिक परिणाम होत आहे. उपभोक्ता वस्तू क्षेत्र आणि लघु तसेच मध्यम उद्योगांनाही याचा फटका बसला आहे. ज्या उद्योगांचा संबंध थेट उपभोक्त्यांशी येतो त्या उद्योगांच्या नफ्यामध्ये निश्चितच घट होणार आहे.

नोटबंदीनंतर नगदीचे संकट सर्वांसमोर आहे. याला सामोरे जाण्यासाठी पोस्ट कार्यालयांना रिझर्व्ह बँकेने केवळ २३८ कोटी रुपयेच दिले आहेत. मागील ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अचानक मोठ्या नोटा बंद केल्या. यानंतर ११.५ कोटी रुपये मूल्यांच्या नोटा बँकिंग तंत्रात परत आल्या आहेत. दुसरीकडे आरबीआयने ४ लाख कोटी रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या आहेत.

५ लाखांपर्यंत प्राप्तिकरात सूट हवी
असोचेमच्या मते, प्राप्तिकरात सध्या अडीच लाखांची मर्यादा आहे. यात वाढ करून पाच लाख करण्यात यावी. याच पद्धतीने १५ ते २० लाख रुपयांच्या प्राप्ती करारावर १० टक्क्यांच्या दरावर कर लावणे आवश्यक आहे. वस्तू आणि सेवा कराचे सरासरी दर १८-१५ टक्के करणे आवश्यक आहे
बातम्या आणखी आहेत...