आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात फळ आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहे. मध्य आशियातील देशांकडून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विचारणा होत आहे. जागतिक बाजारपेठेला राज्यामध्ये मोठी संधी असून, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील, अशी ग्वाही देत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग कृषी प्रक्रिया उद्योगासाठी वरदान ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागामार्फत नवी दिल्ली येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०१७ दरम्यान “वर्ल्ड फूड इंडिया २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिकस्तरावरील प्रदर्शनाची माहिती देण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते.  

अन्न प्रक्रिया उद्याेगात १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा अंदाज : काैर  
उत्पादन क्षेत्रानंतर सर्वात झपाट्याने विकसित हाेणारा उद्याेग म्हणून अन्न प्रक्रिया उद्याेगाकडे अाज बघितले जात अाहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत या क्षेत्रात १० अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक हाेण्याची अपेक्षा केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्याेगमंत्री हरसिमरतकाैर बादल यांनी व्यक्त केली. नेदरलँड, डेन्मार्क, संयुक्त अरब अमिरात, जपान, इटली यासह अन्य अनेक देशांनी अन्न प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दाखवले अाहे. विशेषकरून युरोप, जपान अाणि मध्यपूर्व देशांनी जास्त स्वारस्य दाखवले अाहे. त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्याेगात पुढील पाच वर्षांत १० अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे काैर यानी स्पष्ट केले.  

महाराष्ट्रातील प्रकल्प   
महाराष्ट्रात वाहेगाव (औरंगाबाद), देवगाव (सातारा), सिंधीविहिरी (वर्धा) या तीन ठिकाणी मेगा फूड पार्क मंजूर झाले असून सातारा येथील फूड पार्क लवकरच कार्यान्वित होणार आहे, तर अन्य दोन फूड पार्कचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...