आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादकांना लाभ: आंब्यासाठी यंदाचे वर्ष गोड, निर्यात 15 टक्क्यांनी वाढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फळ माशी सापडल्याने २०१५ मध्ये देशातून होणाऱ्या आंबा निर्यातीला जोरदार फटका बसला होता. यंदा मात्र आंबा निर्यातीत १५ ते २०% वाढ होण्याची शक्यता आंबा निर्यातदारांनी वर्तवली आहे. युरोपियन युनियनच्या विविध नियमांची पूर्तता २०१६ मध्ये पूर्ण असल्याने यंदा युरोपाच्या बाजारात हापूस, केशर, लंगडा व इतर आंबे चमकण्याचे संकेत आहेत.
या संदर्भात आंब्याचे निर्यातदार अशोक हांडे यांनी सांगितले, २०१५ आंब्यासाठी खडतर राहिले. युरोपीय समुदायाने फळमाशीवरून भारतातील आंब्यावर बंदी घातली. त्याचा फटका अनेक आंबा उत्पादकांना बसला. यंदा मात्र फळमाशीसंदर्भातील नियमांची चांगली पूर्तता आपण केली आहे. त्यामुळे आंब्यासाठी युरोपच्या बाजारपेठेचा मार्ग यंदा खुला राहील. देशातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीपैकी युरोपचा वाटा ५ ते ७ % आहे. हा टक्का वाढण्यास चांगला वाव आहे. अमेरिकेचा १ ते २%, आखाती देशांचा ४०%, तर प्रक्रिया उद्योगाचा वाटा २० ते ४०% आहे.
केशर, हापूसला प्राधान्य
निर्यात होणाऱ्या आंब्यात प्रामुख्याने केशर व हापूस यांना प्राधान्य असते, याचा लाभ कोकण आणि मराठवाड्याला होईल, असे मत हांडे यांनी व्यक्त केले. या शिवाय जामनगर, सौराष्ट्रातील केशरलाही चांगली मागणी असते. यंदा पहिली पेटी कोकणात आली, ती प्रथेप्रमाणे सिद्धिविनायकास अर्पण केली.
कर्नाटकी हापूसची स्पर्धा
देशातही विविध राज्यांतून हापूसला चांगली मागणी असते. त्यात अलिकडच्या काळात कर्नाटकातील हापूसने स्पर्धा निर्माण केली आहे. कर्नाटकी हापूस दिसायला आकर्षक व स्वस्त असला तरी कोकणच्या हापूसची चवीचा दर्जा त्याला नाही,याकडे हांडे यांनी लक्ष वेधले.
- ४२,९९८ क्विंटल आंबा निर्यात २०१५ मध्ये
- ३०२.५४ कोटी रुपयांचा महसूल निर्यातीतून
- २५% महाराष्ट्राचा आंबा निर्यातीतील वाटा
(स्रोत : APEDA)