आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा सुटला, शेतकरी नाही, व्यापारीच देणार आडत, बाजार समितीत भाजीपाला लिलाव सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमधील व्यापारी आणि आडतदारांत गुरुवारी आडतीच्या टक्केवारीवर बैठक होऊन शेतकऱ्यांकडून कोणतीही आडत घेण्यात येणार नसून व्यापाऱ्यांकडून पावणे तीन टक्के आडत तसेच बाजार समितीला एक टक्का शुल्क देण्याचे निश्चित झाले. व्यापाऱ्यांनी या निर्णयाला मान्यता दिल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याचे लिलाव गुरुवारी दुपारनंतर अखेर पाच दिवसांनी पूर्ववत झाले. मात्र, नाशिक बाजार समिती वगळता जिल्ह्यात इतरत्र कांद्याचे लिलाव बंद राहतील.

नाशिक बाजार समितीत कांद्यावर ४ तसेच बटाटा आणि डाळिंबाच्या लिलावात व्यापारी ६ टक्के आडत देणार असून त्याचे लिलाव आज (दि. १५ ) पासून सुरू होतील. आडत आणि बाजार समिती नियमन मुक्तीविरोधात आडतदार आणि व्यापाऱ्यांनी बाजारसमित्यांतील लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर कडाडले होते. सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत नाशिक वगळता राज्यातील व्यापाऱ्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर गुरुवारी नाशिकमध्येही व्यापारी व आडतदारांत बैठक होऊन वादावर तोडगा काढत संप मागे घेण्यात आला.
बहुतांश शहरे नाशिकवर अवलंबून
नाशिक जिल्ह्यातील हवामान सर्वच भाजीपाला, फळपिकांसाठी अनुकूल अाहे. जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष, टरबूज, खरबूज, पेरू, सीताफळ, स्ट्रॉबेरी, कांदा, टोमॅटो यांच्यासह काकडी, मेथी, सिमला मिरची, हिरवी मिरची आदी भाजीपाला उत्पादित होतो. एकट्या नाशिकमधून प्रतिदिन सुमारे अडीचशे ते तीनशे क्विंटल भाजीपाला मुंबई, कल्याण, ठाणे, सुरत, बडोदा, अहमदाबाद, इंदूर, पुणे आदी शहरांत पाठविला जातो. संप काळात या ठिकाणचा भाजीपाला पुरवठा ठप्प झाल्याने दर कडाडले होते. आता लिलाव पूर्ववत झाल्याने भाजीपाल्याची आवक वाढून दरात घसरण होईल.
लाभ घ्यावा : आडतदार आणि व्यापाऱ्यांनी एकमताने पावणेतीन टक्के आडत देण्याचे निश्चित करण्यात आले. आता लिलाव पूर्ववत सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन व्यापारी संदीप पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांसाठी बाजार समिती सुरक्षित
दोन्ही घटकांनी योग्य निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची आता गैरसोय होणार नाही. शेतकऱ्यांना कोणतीही आडत लागणार नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी बाजार समितीत आणावा. - अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती
आजपासून डाळिंब मार्केटमध्ये लिलाव
डाळिंब मार्केट शुक्रवारपासून सुरू होईल. व्यापारी, आडतदारांत बोलणी झाली असून व्यापाऱ्यांनी ६ टक्के आडत देण्याचे निश्चित केले. शेतकऱ्यांकडून आडत घेणार नाही.
ईश्वर गुप्ता, आडतदार
बातम्या आणखी आहेत...