आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरला १०.३ कोटींचे नुकसान, ९ टक्के कर्मचारी कपात करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- आर्थिक संकटाशी लढा देत असलेले ट्विटर हे मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ ९ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनी विकत घेण्यासाठी पुन्हा कुणीच पुढे न आल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ट्विटर कंपनीत जगभरात ३,८६० लोक कार्यरत आहेत. यापैकी ३५० जणांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

कंपनीचे प्रमुख जॅक डोरसी यांनी तिसऱ्या तिमाहीचा ताळेबंद सादर करतेवेळी ही माहिती दिली. डोरसी म्हणाले, ट्विटरसाठी विकासाच्या अनेक शक्यता आहेत. याबाबत आमच्या स्पष्ट योजना आहेत. काेअर सर्व्हिस अधिक चांगली करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्यानुसार आवश्यक परिवर्तनही सुरू आहेत. पुनर्गठनासाठी कंपनी १ ते २ कोटी डॉलर खर्च करणार आहे. ट्विटरने त्यांच्या या तिमाहीत १०.३ कोटी डॉलरचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या १३.२ कोटी डॉलरच्या तुलनेत हे नुकसान कमी आहे. दुसरीकडे, जाहिरातींच्या माध्यमातून ट्विटरचा महसूल ८ टक्क्यांनी वाढून ६१.६ कोटी डॉलरवर पोहोचला आहे. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा हा आकडा निश्चितच जास्त आहे. डोरसीने यास सकारात्मक संकेत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, तिमाहीची आकडेवारी जारी होताच ट्विटरच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

कंपनी विक्रीच्या आशा संपुष्टात
दरम्यान, ट्विटरने मागच्या महिन्यात प्रवर्तकाची नियुक्ती करून कंपनी विक्रीबाबत प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. मात्र, तेव्हा कुणीच इच्छुक कंपनी विकत घेण्यास न आल्याने व्यवस्थापनाच्या पदरी निराशाच पडली होती. आताही सेल्सफोर्स डॉट कॉम इंककडून कोणतीच बोली न लावण्यात आल्याने कंपनीच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत. सेल्सफोर्स बोली लावेल, अशी ट्विटरला शेवटी आशा होती.
बातम्या आणखी आहेत...