आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोसॉफ्ट 1.75 लाख कोटी रुपयांत घेणार लिंक्डइन नेटवर्किंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- मायक्रोसॉफ्ट याजगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कंपनीने लिंक्डइन हा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा सौदा २६.२ अब्ज डॉलर म्हणजेच १.७५ लाख कोटी रुपयांमध्ये निश्चित झाला आहे. ही खरेदी नगदी होणार आहे. म्हणजेच लिंक्डइनच्या भागधारकांना मायक्रोसॉफ्टच्या शेअरऐवजी रोख रक्कम मिळेल. त्यासाठी एका शेअरची किमत १९६ डॉलर (१३, १५९ रुपये) ठरवण्यात आली आहे.

शुक्रवारी बंद झालेल्या लिंक्डइनच्या शेअरच्या भावापेक्षा ही रक्कम ४९.५ टक्के जास्त आहे.
कराराची घोषणा झाल्यानंतर सोमवारी लिंक्डइनच्या शेअरच्या किमती ४८ टक्क्यांनी उसळल्या. मात्र मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये दोन टक्के घसरण झाली. डिसेंबर २०१६ पर्यंत हा सौदा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही कंपन्यांच्या मंडळांनी या कराराला मंजुरी दिली आहे. या कराराला नियामकाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

भारतात लिंक्डइनचे ६५० कर्मचारी आहेत. कंपनीचे हस्तांतरण झाल्यानंतरही लिंक्डइनचा विशिष्ट ब्रँड, संस्कृती आणि स्वायत्तता कायम राहील, असे स्पष्टीकरण मायक्रोसॉफ्टने दिले आहे. हा सौदा याच वर्षात पूर्ण होण्याची आशा आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले, लिंक्डइनच्या टीमने जगभरातील व्यावसायिकांना कनेक्ट करण्यावर केंद्रित असलेला जबरदस्त व्यवसाय उभारला आहे. आम्ही एकत्र येऊन लिंक्डइन तथा मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ आणि त्याच्या विकासाला चालना देऊ शकतो. कारण आम्हाला जगातील प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेला सक्षम करायचे आहे. जेफ वेइनर लिंक्डइनचे सीईओ म्हणून कायम राहतील. ते नाडेलांच्या अंतर्गत काम पाहतील.
लिंक्डइनची सुरुवात : लिंक्डइनची सुरुवात तिचे सहसंस्थापक हाफमॅन यांच्या घरातील एका खोलीत नाेव्हेंबर २००२ मध्ये झाली होती. ५ मे २००३ ला ती अधिकृतरीत्या लाँच झाली.
लिंक्डइनचे सध्या ४३.३ कोटी युजर्स आहेत.
> ४३.३ कोटी लिंक्डइनचे जगभरात सदस्य
> १९% त्यात वार्षिक वाढ होत आहे
> २.९९ अब्ज डॉलर्सचा महसूल (२०१५)
> १६६ कोटी डॉलर्सचे निव्वळ उत्पन्न

काय आहे लिंक्डइन
लिंक्डइन हे प्रोफेशनल सोशल पोर्टल आहे. त्यावर फक्त मित्र बनवणेच नव्हे तर योग्य वापराने मनपसंत नोकरीही मिळवली जाऊ शकते. येथे युजर्सना मत-विचार मांडण्यासोबतच व्यावसायिक उपलब्धीही शेअर करता येते. आपल्या संबंधित क्षेत्रात नाेकऱ्याही शोधता येतात.
बातम्या आणखी आहेत...