आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीचे ‘मुख्य अभियंता’ औरंगाबादेत, नाशिक, जळगाव, नगरच्या उद्योजकांची सोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील उद्योगांना तांत्रिक मंजुरीचे प्रस्ताव पुणे कार्यालयामार्फत मुंबईला पाठवावे लागत होते. ही अडचण पाहून तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय मराठवाड्यात आणले. नांदेड येथे कार्यालय मंजूर करून घेतले खरे; परंतु औरंगाबादच्या उद्योगांची हाेणारी गैरसोय मात्र थांबली नव्हती. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाॅरमुळे (डीएमआयसी) हे कार्यालय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आता औरंगाबादेत हलवले आहे. एवढेच नाही तर नाशिक, नगर, जळगाव आणि धुळे हे विभागही या कार्यालयाला जोडले आहेत. मराठवाड्यातील सुमारे २ हजार उद्योगांची यामुळे सोय होईल.

मराठवाड्यातील उद्योगांना कोणत्याही तांत्रिक मंजुरीसाठी पुण्याच्या मुख्य अभियंता कार्यालयामार्फत मुंबईला प्रस्ताव पाठवावे लागत हाेते. प्रस्ताव पुण्यातच पडून राहत. हे प्रस्ताव थेट शासनाकडे जातील अशा हेतूने अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे हे कार्यालय मंजूर करून घेतले. पुढे काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात ते नांदेडातच राहिले. तथापि, औरंगाबादेत बहुसंख्येने असलेल्या उद्योजकांची अडचण मात्र दूर झाली नव्हती.

नांदेड कार्यालय नावालाच : नांदेडच्या उद्योग भवन इमारतीत पाच वर्षांपासून हे मुख्य अभियंता कार्यालय कागदोपत्रीच होते. तांत्रिक मंजुरीचे अधिकार असतानाही येथून एकही प्रस्ताव गेला नाही. त्यामुळे उद्योजकांनी तक्रारी केल्यानंतर युती सरकारने उद्योजकांच्या बैठका घेतल्या. उद्योग महामंडळाच्या संचालक मंडळाशी चर्चा करून मंत्री देसाई यांनी २८ सप्टेंबर २०१५ रोजी कार्यालय स्थलांतराचा ठराव घेतला. राजकीय दबावामुळे स्थलांतर मात्र होत नव्हते. अखेरीस महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. जऱ्हाड यांच्या स्वाक्षरीने ७ जुलै २०१६ रोजी पत्र काढले आणि हे कार्यालय औरंगाबादेत सुरू करण्याचे आदेश दिले.
३५ एमआयडीसी जोडल्या, सोमवारपासून कामकाज : मराठवाड्यातील १५, नाशिकच्या ८, जळगाव- धुळेच्या ८ अशा ३१ आणि तालुक्यातील ४ अशा ३५ एमआयडीसी मुख्य अभियंत्यांशी जोडल्या गेल्या आहेत. शिवाय नगरदेखील या कार्यालयाशी संबंधित असेल. मराठवाड्यातील २ हजारांवर उद्योजकांची यामुळे सोय होणार आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळील उद्योगशक्ती इमारतीत हे कार्यालय सोमवारपासून सुरू होत आहे, असे एमआयडीसीचे मुख्य अभियंता केदार नागपुरे यांनी सांगितले. नांदेड येथे कार्यरत कर्मचारीवृंद येथे असेल.
उद्योगनगरीसाठी सकारात्मक निर्णय
डीएमआयसीचे काम वेगात सुरू आहे. उद्योगनगरी विकसित होण्यासाठी अशी महत्वाची कार्यालये औरंगाबादेत असणे गरजेचे आहे. नांदेड येथील मुख्य अभियंता कार्यालय औरंगाबादेत आल्याने उद्योगाचा झपाटयाने विकास होईल.
गजानन पाटील, महाव्यवस्थापक डीएमआयसी
नांदेडपेक्षा सोयीचे
मराठवाड्याच्या विकासात प्रस्तावांच्या तांत्रिक मंजुरीचा अडसर होता. विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय असल्यास अडचणी येणार नाहीत. नांदेड एका बाजूला पडत होते. भविष्याचा विचार करून हे कार्यालय औरंगाबादला हलवले.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री, महाराष्ट्र

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...