आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएमईआय कोडने मोबाइल शोधणे पोलिसांसाठीदेखील झाले अवघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हरवलेला मोबाइल पोलिस आयएमईआय कोडच्या मदतीने शोधतील, असे वाटत असेल तर ते चुकीचे ठरू शकेल. यापासून वाचण्याची संधी चोरांनी शोधली असून इंपोर्टेड अ‍ॅप्लिकेशन आणि आयएमईआय क्रॅकरच्या मदतीने चोर तुमच्या मोबाइलचा कोडच बदलून टाकतात.

आयएमईआय हा १५ अंकाचा एक युनिक नंबर असतो. यात प्रत्येक मोबाइलचा वेगळा नंबर असतो. जर मोबाइल हरवला किंवा चोरी झाला तर या नंबरने मोबाइल ट्रॅक करता येतो. तसेच या माध्यमातून फोन डिअ‍ॅक्टिवेटदेखील करता येतो.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, आजकाल चाेर अशा अ‍ॅप्लिकेशनची खरेदी करून आयएमईआय नंबर बदलतात. या माध्यमातून मोबाइल कंपनीच्या आयएमईआय डेटाबेसपर्यंत हे चोर पोहोचले आहेत. हे अ‍ॅप्लिकेशन सिंगापूर येथील बाजारातून चोर विकत घेत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मोबाइल चोरीत दिल्ली पुढे
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दररोज ३,७०० मोबाइल चोरी होतात. यातील एक टक्कादेखील मोबाइलचा शोध पोलिस लावू शकत नाहीत. दिल्ली पोलिसांच्या नोंदणीनुसार दिल्लीत मोबाइल चोरींच्या घटनेमध्ये ८५ टक्के वाढ झाली आहे, तर मोबाइल ओढून नेण्याच्या प्रमाणात ६० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दिल्लीत फोन ओढून नेण्याच्या ३,०८२, तर लुटण्याच्या ४८६ आणि चोरीच्या ७,३५,१०५ घटना घडल्या, तर या वर्षी आॅगस्टमध्ये ओढण्याच्या ३,३२२ ,लुटीच्या ४३३ आणि चोरीच्या ९,०२,८५० घटना घडल्या आहेत.

२० हजारांत उपलब्ध
या अ‍ॅप्लिकेशनसोबत एक हार्डवेअरदेखील असते. त्याला आयएमईआय क्रॅकर म्हटले जाते. याला १६ ते २० हजार रुपयांत विकत घेतले जाते. या माध्यमातून चोरीच्या अनेक मोबाइलला एकच आयएमईआय नंबर देतात. यामुळे चाेरी गेलेला नेमका फोन शोधणे पोलिसांना अवघड जाते.