नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय गुणांकन एजन्सी मुडीजने या वर्षी भारताच्या विकासाचा अंदाज ७.५ वरून ७ टक्के केला आहे. औद्योगिक उत्पादन आणि गुंतवणुकीत सुधारणांची गती कमी असल्याने असे करण्यात आले आहे. खराब मान्सूनमुळे खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता मुडीजने व्यक्त केली आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता नाही. तसेच स्विस ब्रोकरेज फर्म यूबीएसनेदेखील या वर्षी विकासाचा अंदाज ७.५ टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आला आहे.
मुडीजच्या मते विकासाची गती मंद असली तरी त्याची दिशा सकारात्मक आहे. यामुळेच त्यांनी २०१६ साठी भारताचा विकासदराचा अंदाज ७.५ टक्के कायम ठेवला आहे. गेल्या वेळी तो ७.६ टक्के होता. यूबीएसने वर्ष २०१६-१७ साठी ८.३ टक्क्यांऐवजी ७.६ टक्के विकासाचा अंदाज वर्तवला आहे. सरकारच्या वतीने ३१ आॅगस्टला जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ३० जूनला संपलेल्या तीन महिन्यांत सकल घरेलू उत्पादन (जीडीपी)ची वाढ सात टक्के होती. सरकारच्या वतीने या वर्षी ८ ते ८.५ टक्के विकास दर गाढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या वर्षी जूनच्या तुलनेत या वर्षी कच्चे तेल ६० टक्के स्वस्त झाले आहे. त्यामुळे चालू खात्यात तोटा कमी होण्याचा अंदाज मुडीजने व्यक्त केला आहे. २०१२ मध्ये चालू खाता तोटा ४.८ टक्के होता, जो २०१४ मध्ये २.४ टक्क्यांवर आला आहे. या वर्षीदेखील अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
चीनमध्येही घट
काही महिन्यांपासआर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या चीनचा विकासदर ६.३ टक्के राहण्याची शक्यता आहे. याआधी ६.५ टक्के अंदाज व्यक्त करण्यात आला होता. चीनच्या मंदीमुळे आशियासह इतर देशांच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. यामुळे त्या देशांच्या विकासदरातही घट होण्याची शक्यता आहे.