आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Moody's Raises India Outlook To 'positive', Edges Toward Rating

मुडीज भारताबाबत"पॉझिटिव्ह', दीड वर्षात आणखी सुधारणार रेटिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रेडिट रेटिंग एजन्सी मुडीजचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे. एजन्सीने देशाचे पतमानांकन आऊटलूक (दृष्टिकोन) स्टेबल (स्थिर) वरून वाढवून पॉझिटिव्ह (सकारात्मक) केले आहे. येत्या १२ ते १८ महिन्यांत देशाच्या सार्वभौम पतमानांकनातही सुधारणा होऊ शकते, असे मत मुडीजने व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार काय पावले टाकते यावर ही सुधारणा अवलंबून राहील, असे मुडीजने स्पष्ट केले आहे. कोणत्याही देशाचे पतमानांकन व सार्वभौम रेटिंग विदेशी गुंतवणूकदार अत्यंत महत्त्वाचे मानतात. जागतिक पातळीवरील संस्था पतमानांकनाच्या आधारे संबंधित देशातील गुंतवणुकीबाबतच्या परिस्थितीचा अंदाज घेत असतात.

मुडीजने २००४ पासून भारताला बीएए ३ मानांकन दिले आहे. गुंतवणुकीच्या श्रेणीतील ही सर्वात खालची श्रेणी आहे. इंडोनेशिया, आइसलँड आणि तुर्कस्तान या देशांप्रमाणे ही श्रेणी आहे. इतर जागतिक पातळीवरील रेटिंग एजन्सी जसे एस अँड पी आणि फिचने भारतासाठी हीच रेटिंग दिली आहे. उच्च पातळीवर पोहोचलेली महागाई, केंद्र तसेच राज्य सरकारवरील वाढता कर्जाचा डोंगर, पायाभूत क्षेत्रातील समस्या आणि बँकांची थकलेली कर्जे यामुळे या सर्व एजन्सींनी भारताला या श्रेणीत ठेवले आहे. अलीकडेच एस अँड पीने भारताचे पतमानांकन वाढवून स्टेबल केले आहे, तर फिचने २०१३ पासून स्टेबल असे मानांकन दिले आहे.

सकारात्मक संकेत
मुडीजने देशाचे पतमानांकन सुधारणे हे सकारात्मक संकेत आहेत. सरकारकडून आर्थिक सुधारणा व धोरणाबाबत टाकण्यात आलेल्या पावलांचा हा परिणाम आहे. आता आणखी गतीने आर्थिक सुधारणा करणे आवश्यक आहे. - अरुण जेटली, अर्थमंत्री

रेटिंग एजन्सी मुडीजकडून भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचा दृष्टिकोन सुधारल्याने भारताप्रति गुंतवणूकदारांचा विश्वास दुणावणार आहे. - शशिकांत दास, महसूल सचिव

पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर आहे. वाढ व विकासासाठी सरकार योग्य ती पावले टाकत आहे. पतमानांकनाबाबत दृष्टिकोन सुधारणे म्हणजे सरकार योग्य दिशेने जात असल्याचे सिद्ध करणारे आहे. - अरविंद सुब्रह्मण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार

मुडीजच्या अपेक्षा
- केंद्र सरकारकडून वाढीसाठी गतीने पावले टाकण्याची अपेक्षा.
- भारताची स्थिती इतर आशियाई देशांपेक्षा खूप चांगली आहे.
- जिनसांच्या (कमोडिटी) किमतीतील नरमाईने भारताला चांगला फायदा.
- भारताच्या सार्वभौम पतमानांकनातील अडथळे नियंत्रणात दिसताहेत.

देशापुढील आव्हाने
- बँकांचा असेट दर्जा चिंताजनक.
- कर्जवसुली अत्यंत कमकुवत.
- अर्थव्यवस्थेला विदेशी, वित्तीय धक्क्यांचा धोका.
- महागाईचा वेळोवेळी उद्भवणारा दबाव.