नवी दिल्ली - बाजारात दोन आठवड्यांच्या आधीच सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. यामुळे सोयाबीनच्या किमती कमी झाल्या आहेत. सोमवारी इंदूर येथील बाजारात ४ टन सोयाबीनची आवक झाली. यामध्ये ओल्या सोयाबीनचा समावेश असून त्याचे प्रमाण २० ते ३० टक्के असल्याचे येथील व्यापार्यांनी सांगितले. येथे ३३०० ते ३३५० रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची विक्री झाली. येत्या काळात आवक वाढल्याने सोयाबीनचे भाव आणखी कमी होण्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
इंदूर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन. के. अग्रवाल यांनी सांगितले की, खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी झाली होती. त्यामुळे वेळेआधीच बाजारामध्ये आवक सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या नव्या सोयाबीनची गुणवत्ता चांगली आहे. गेल्या वर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे उत्पादनाला फटका बसला होता. गेल्या वर्षी ३३०० रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची विक्री झाल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.